छ. संभाजीनगरच्या विकासासाठी स्वतंत्र पर्यटन मॉडेल विकसित करण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर, 29 ऑगस्ट (हिं.स.) : छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासोबतच प्रशासकीय प्रक्रिया अधिक सुलभ आणि कार्यक्षम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सद
Q


छत्रपती संभाजीनगर, 29 ऑगस्ट (हिं.स.) : छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासोबतच प्रशासकीय प्रक्रिया अधिक सुलभ आणि कार्यक्षम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सचे कुलपती, प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ, लेखक व शहरी विकास अभ्यासक संजीव सान्याल यांनी केले.

सीएमआयएच्या पुढाकाराने आयोजित ‘Process Reforms for Ease of Doing Business in India’ या कार्यक्रमात ते मार्गदर्शन करत होते. यावेळी छत्रपती संभाजीनगरच्या उद्योगवाढीसाठी आवश्यक उपाययोजना, प्रशासकीय प्रक्रियांतील अडथळे तसेच शहराच्या भविष्यातील विकासाच्या विविध पैलूंवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

प्रशासकीय प्रक्रियांमधील अडथळे ओळखून त्या अधिक सोप्या आणि कार्यक्षम करण्यावर भर देण्याची आवश्यकता असल्याचे सान्याल यांनी सांगितले. केवळ प्रक्रियांचे डिजिटलायझेशन करणे म्हणजे सुधारणा नव्हे, तर उद्योग आणि नागरिकांना प्रत्यक्ष भेडसावणाऱ्या अडचणी दूर करून प्रक्रिया अधिक सुलभ करणे ही खरी सुधारणा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

छत्रपती संभाजीनगरने आपल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांना केंद्रस्थानी ठेवून स्वतंत्र पर्यटन मॉडेल विकसित करावे, असे आवाहनही सान्याल यांनी केले. शहरात येणाऱ्या पर्यटकांचा मुक्काम वाढविण्यासाठी प्रभावी नियोजन केल्यास स्थानिक व्यवसाय, रोजगाराच्या संधी आणि एकूणच शहराच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळू शकते, असे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमात उद्योगांसाठी प्रशासकीय प्रक्रिया अधिक सुलभ करण्याबरोबरच व्यवसाय क्षेत्रातील नव्या संधी, गुंतवणुकीला पोषक वातावरण आणि छत्रपती संभाजीनगरच्या भविष्यातील विकासाला गती देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर संवाद झाला. उद्योगवाढीसाठी प्रशासन, उद्योगक्षेत्र आणि संबंधित घटकांमध्ये समन्वय वाढविण्याची गरजही यावेळी अधोरेखित करण्यात आली.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande