अमरावती - आदिवासी विद्यार्थी राजेश बेठेकर मृत्यू प्रकरणी मृतदेह बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू
अमरावती, 29 ऑगस्ट (हिं.स.)। कुटुंबीयांकडून संचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी अमरावती येथील वादग्रस्त महर्षी पब्लिक स्कूलमधील आदिवासी विद्यार्थी राजेश बेठेकर यांच्या मृत्यू प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. राजेशच्या मृत्यूला शा
राजेश बेठेकर मृत्यू प्रकरणी मृतदेह बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू


अमरावती, 29 ऑगस्ट (हिं.स.)।

कुटुंबीयांकडून संचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

अमरावती येथील वादग्रस्त महर्षी पब्लिक स्कूलमधील आदिवासी विद्यार्थी राजेश बेठेकर यांच्या मृत्यू प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. राजेशच्या मृत्यूला शाळा प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करीत त्याच्या कुटुंबीयांनी शनिवारी चिखलदरा पोलिस ठाण्यात धाव घेतली.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी शुभम जवंजाळ यांच्या नेतृत्वाखाली राजेशचे वडील बाबू साबूलाल बेठेकर, भाऊ आशिष बाबू बेठेकर, विलास भालधरे यांच्यासह नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात उपस्थित राहून महर्षी पब्लिक स्कूलच्या व्यवस्थापनाविरोधात कारवाई करण्याची मागणी केली.महर्षी पब्लिक स्कूलचे संचालक प्रशांत राठी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. राजेशची प्रकृती खालावलेली असतानाही शाळा प्रशासनाने त्याच्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. योग्य वेळी उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.दरम्यान, नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांकडून मर्ग दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राजेशचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्यासाठी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे (एसडीएम) परवानगी मागण्यात आल्याची माहिती आहे. येत्या सोमवारी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.दरम्यान, राजेशसोबत प्रकृती बिघडलेला त्याचा चुलत भाऊ रामप्रसाद बेठेकर याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. रामप्रसाद याला अन्नातून विषबाधा झाल्याचा डॉक्टरांचा वैद्यकीय अहवाल राजेशच्या वडिलांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीसोबत सादर केला आहे.या प्रकरणात पोलिसांकडून तपास सुरू असून, शवविच्छेदन अहवाल, वैद्यकीय कागदपत्रे आणि तपासातून समोर येणाऱ्या तथ्यांच्या आधारे राजेश बेठेकर यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. त्यानंतर या प्रकरणात कोणाची जबाबदारी निश्चित होते, हे स्पष्ट होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande