
अमरावती, 29 ऑगस्ट (हिं.स.)। सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी चांदूर रेल्वे पोलीस विभागाच्या वतीने शहरातील विविध शाळांमध्ये मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणूक, अनोळखी व्यक्तींपासून दूर राहणे, मोबाइल गेमिंगचे दुष्परिणाम तसेच बनावट लिंक व एपीके फाइलच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीबाबत माहिती देण्यात आली.
चांदूर रेल्वे शहरातील जिजामाता कन्या शाळा, जि.प. माध्यमिक शाळा, सरस्वती प्राथमिक शाळा तसेच नगरपरिषद पूर्व नेहरू प्राथमिक शाळा येथे हा जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आला. यावेळी एपीआय मनीषा सामटकर तसेच पोलीस उपनिरीक्षक नंदलाल लिंगोट यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या संदेशांना, लिंकला किंवा फाइलला प्रतिसाद देऊ नये, तसेच वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर करू नये, असे आवाहन करण्यात आले.
सायबर फसवणूक झाल्यास अथवा संशयास्पद व्यवहार लक्षात आल्यास तात्काळ सायबर हेल्पलाइन १९३० वर संपर्क साधावा. तसेच सायबर फसवणूक, सिमकार्ड, मोबाइल किंवा दूरसंचाराशी संबंधित तक्रारींसाठी १९४५ वर संपर्क करण्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. यासोबतच अनोळखी एपीके फाइल डाउनलोड किंवा इन्स्टॉल करू नये, क्युआर कोड स्कॅन करण्यापूर्वी त्याची खात्री करावी आणि सोशल मीडियाचा वापर काळजीपूर्वक करावा, असेही पोलिसांनी सांगितले. मोबाइलचा वाढता वापर, ऑनलाइन गेमिंग आणि इंटरनेटच्या माध्यमातून होणाऱ्या संभाव्य दुष्परिणामांबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. सायबर अवेअरनेस जनजागृती कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी स्वतः सुरक्षित राहण्यासोबतच आपल्या कुटुंबीयांनाही सायबर सुरक्षेबाबत जागरूक करावे, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी