
परभणी, २९ ऑगस्ट (हिं.स.) : नियमित खेळामुळे शरीरसंपदा वाढते, बुद्धिमत्ता विकसित होते, आत्मविश्वास दृढ होतो. तसेच शिस्त, संघभावना आणि नेतृत्वगुणांची जोपासना होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत किमान एका खेळात सक्रिय सहभाग घेणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन मराठवाडा हायस्कूलचे पर्यवेक्षक सूर्यकांत पाटील यांनी केले.
शिवाजीनगर येथील मराठवाडा हायस्कूलमध्ये हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे पर्यवेक्षक सूर्यकांत पाटील होते. प्रमुख वक्ते म्हणून डॉ. सुनील तुरुकमाने उपस्थित होते. सहाय्यक पर्यवेक्षक सुनील रामपूरकर आणि विद्यार्थी संसदेचे श्रीपाद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते डॉ. सुनील तुरुकमाने यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे महत्त्व विशद केले. मेजर ध्यानचंद हे भारतीय हॉकीतील महान खेळाडू म्हणून ओळखले जातात. त्यांच्या उत्कृष्ट खेळामुळे भारतीय हॉकीला जागतिक स्तरावर मोठी ओळख मिळाली. त्यांच्या जन्मदिनानिमित्त देशभर राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन क्रीडाक्षेत्राची आवड जोपासावी आणि नियमित सरावाच्या माध्यमातून या क्षेत्रात आपले नाव निर्माण करावे, असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय समारोपात सूर्यकांत पाटील यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. लहानपणी तलावात भोपळा बांधून पोहायला जात असल्याचे सांगत, त्या काळात साधनसामग्री मर्यादित असतानाही खेळ, व्यायाम आणि शारीरिक श्रमामुळे शरीर व मन तंदुरुस्त राहत असल्याचे त्यांनी नमूद केले.
नियमित खेळामुळे केवळ शारीरिक क्षमता वाढत नाही, तर बुद्धिमत्ता विकसित होण्यासोबत आत्मविश्वास दृढ होतो. शिस्त, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित होण्यासही खेळाची मोठी मदत होते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने अभ्यासासोबत किमान एका खेळात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप मुळे यांनी केले, तर आभार वसंत पुरी यांनी मानले. कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-----------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis