
रायगड, 29 ऑगस्ट (हिं.स.)। नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक १६ मधील खांदाड परिसरात पथदिव्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. काही पथदिवे दुरुस्त करून सुरू करण्यात आले असले, तरी अनेक ठिकाणी अद्याप पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांना अंधारातून वाट काढावी लागत आहे. त्यामुळे नगरपंचायतीच्या पथदिवे देखभाल व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रा. जि. प. शाळेपासून मोर्बा रोडच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील अनेक पथदिवे गेल्या काही महिन्यांपासून बंद होते. या समस्येबाबत १४ जुलै २०२६ रोजी PEN न्यूजमध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर शनिवार, २२ ऑगस्टपासून या मार्गावरील काही पथदिवे अंशतः सुरू झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला, तरी संपूर्ण मार्ग अद्याप प्रकाशमान झालेला नाही.
जिल्हा परिषद शाळेजवळील सार्वजनिक शौचालयाच्या लाईटमुळे रस्त्याच्या काही भागात प्रकाश मिळत आहे. पुढे वाडा रोडच्या दिशेनेही काही पथदिवे सुरू झाले आहेत. मात्र, वाडा कॉर्नरपासून डोंगरे यांच्या निवासस्थानापर्यंत सुमारे आठ पथदिव्यांचे खांब अद्याप बंद असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
या समस्येबाबत नगरपंचायतीच्या तक्रार नोंदवहीत अनेक दिवसांपूर्वी नोंद करण्यात आली आहे. तसेच बंद पथदिव्यांचे छायाचित्रांसह पुरावे स्थानिक मंडळाच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्येही शेअर करण्यात आले आहेत. तरीही संबंधित पथदिव्यांची दुरुस्ती न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
अमरदीप हॉस्टेलच्या मागील बाजूस दक्षिण दिशेला जाणाऱ्या महत्त्वाच्या अंतर्गत रस्त्यावरील काही पथदिवे यापूर्वी दुरुस्त करून सुरू करण्यात आले होते. मात्र, काही दिवस सुरू राहिल्यानंतर ते पुन्हा बंद पडले आहेत. त्यामुळे दुरुस्ती करूनही पथदिवे वारंवार बंद पडत असल्याने नगरपंचायतीने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)