भांबोऱ्यात वाघिणीची दहशत कायम; रस्ते निर्मनुष्य, गुरे-ढोरे चाऱ्याअभावी उपाशी
अमरावती, 29 ऑगस्ट (हिं.स.)। तालुक्यातील जुना भांबोरा शिवारात वाघिणीच्या हल्ल्यात शेतकरी चरणदास ईखे यांचा गुरुवारी मृत्यू झाल्यानंतर परिसरात वाघिणीची दहशत कायम आहे. भीतीच्या वातावरणामुळे शेतकरी, शेतमजूर तसेच गुरे-ढोरेही शेतशिवाराकडे फिरकले नसल्याने
भांबोऱ्यात वाघिणीची दहशत कायम; रस्ते निर्मनुष्य, गुरे-ढोरे चाऱ्याअभावी उपाशी


अमरावती, 29 ऑगस्ट (हिं.स.)। तालुक्यातील जुना भांबोरा शिवारात वाघिणीच्या हल्ल्यात शेतकरी चरणदास ईखे यांचा गुरुवारी मृत्यू झाल्यानंतर परिसरात वाघिणीची दहशत कायम आहे. भीतीच्या वातावरणामुळे शेतकरी, शेतमजूर तसेच गुरे-ढोरेही शेतशिवाराकडे फिरकले नसल्याने गावातील रस्ते शुक्रवारी निर्मनुष्य दिसून आले. गुरेढोरे रानात चरायला न गेल्याने अनेक जनावरे चारा-पाण्यावाचून उपाशी असल्याचे चित्र आहे.

वनविभागाच्या वतीने कुटुंबीयांना पाच लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. गावकऱ्यांनी मृत शेतकऱ्याच्या मुलाला कायमस्वरूपी नोकरी देण्याची तसेच परिसरातील वन्यप्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी केली.घनदाट जंगलामुळे शेतात जाणे धोकादायक बनले असून शेतीची कामे ठप्प झाली आहेत. पावसाने उघडीप दिल्याने पिकांना ओलिताची गरज असताना वाघिणीच्या भीतीमुळे शेतकरी शेतात जाण्यास धजावत नाहीत. पिंपळखुटा मोठा, नया वाठोडा, राजुरवाडी, कवठाळ आणि येवती परिसरातील शेतकरी व शेतमजूरही शुक्रवारी शेतशिवारात फिरकले नाहीत.येवती व अंतोरा परिसरातही वाघिणीचा वावरशुक्रवारी सकाळी येवती परिसरात वाघिणीचा वावर वनविभागाच्या निदर्शनास आला. दुपारी वर्धा नदीच्या तीरावरून अंतोरा गावालगतच्या जंगलातही वाघिणीचे लोकेशन मिळाल्याची माहिती आहे. त्यामुळे वर्धा नदीच्या दोन्ही तीरावरील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.वनपरिक्षेत्र अधिकारी योगिता मगर यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. वनविभागाने काही ठिकाणी पिंजरे लावून शोधमोहीम सुरू केली असून अंतोरा, तुळजापूर, लहान आर्वी आणि आष्टीसह परिसरातील गावांना विशेष सावधगिरीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande