
यवतमाळ, 29 ऑगस्ट (हिं.स.)।
बंजारा समाजाच्या समृद्ध लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविणारा पारंपरिक तीज उत्सव श्रावण महिन्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तांड्यांवर या उत्सवाची जय्यत तयारी केली जाते. तरुणी व महिलांचा या उत्सवात मोठा सहभाग असतो. पारंपरिक वेशभूषा, दागदागिने, लोकगीते आणि नृत्यामुळे तांड्यांवर उत्साहाचे वातावरण पहायला मिळते. बंजारा समाजात तीज उत्सवाला धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. उत्सवाच्या सुरवातीला अविवाहित मुलींसाठी बांबूच्या टोपल्या किंवा दुरड्यांमध्ये गहू पेरण्याची परंपरा आहे. अंकुरांना शुभतेचे प्रतीक मानले जाते. पेरणीनंतर दररोज सकाळ, संध्याकाळी त्यावर पाणी टाकले जाते. या काळात तरुणी पारंपरिक बंजारा लोकगीते गातात. तीजच्या टोपल्या मध्यभागी ठेवून त्यांच्या भोवती फेर धरत नृत्य केले जाते. नऊ दिवस चालणार्!या या उत्सवात तरुणी सहभागी होतात. काही परंपरांमध्ये गव्हाचे अंकुर उंच आणि भरघोस वाढणे हे शुभ संकेत मानले जाते. तीज उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बंजारा समाजाची पारंपरिक वेशभूषा, रंगीबेरंगी पोशाख, आरशांचे काम केलेले वस्त्र, पारंपरिक दागिने आणि विविध अलंकार परिधान करून महिला व तरुणी उत्सवात सहभागी होतात. त्यामुळे तांड्यांवर बंजारा संस्कृतीचे मनोहारी चित्र पाहायला मिळते. तीज उत्सव हा केवळ धार्मिक विधी नसून समाजातील एकोपा वाढविण्याचे माध्यमही आहे. विविध ठिकाणी नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी स्थायिक झालेली बंजारा समाजबांधव या निमित्ताने एकत्र येतात. जुन्या रूढी-परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम या उत्सवातून केले जाते. आधुनिक जीवनशैलीमुळे पारंपरिक लोकसंस्कृतीमध्ये अनेक बदल होत असले तरी तीज उत्सवाच्या माध्यमातून बंजारा समाज आपली बोलीभाषा, लोकगीते, नृत्य, वेशभूषा आणि तांडा संस्कृती जपण्याचा प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्रातील बंजारा समाजाची स्वतंत्र बोलीभाषा, लोकसाहित्य, लोकनृत्य आणि तांडा संस्कृती हा समृद्ध सांस्कृतिक वारसा मानला जातो. तीज उत्सवाच्या समारोपावेळी पारंपरिक पद्धतीने तीज विसर्जन किंवा सांगता केली जाते. यावेळी मोठ्या संख्येने महिला, तरुणी आणि समाजबांधव सहभागी होऊन पारंपरिक गीत-नृत्य सादर करतात. त्यामुळे उत्सवाला भक्तीबरोबरच सांस्कृतिक आणि सामाजिक स्वरूप प्राप्त होते. बंजारा समाजाचा तीज उत्सव म्हणजे निसर्गाशी असलेले नाते, धार्मिक श्रद्धा, महिलांचा सहभाग आणि पिढ्यानपिढ्या जपल्या जाणार्!या लोकपरंपरांचा सुंदर संगम आहे.
लोकगीतांना विशेष महत्व तीज उत्सवात बंजारा लोकगीतांना विशेष महत्त्व आहे. पारंपरिक बोलीभाषेतील गीतांमधून समाजाचे जीवन, निसर्ग, नाती-गोती, श्रद्धा आणि सांस्कृतिक मूल्यांचे दर्शन घडते. डफडी आणि पारंपरिक तालवाद्यांच्या साथीने महिला व तरुणी फेर धरून नृत्य करतात. बंजारा समाजातील तीज नृत्य हा लोकसंस्कृतीचा महत्त्वाचा भाग मानला जातो.
-------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी