
अमरावती, 29 ऑगस्ट (हिं.स.)। मेळघाटात अवघ्या चार दिवसांत दोन मातामृत्यू झाल्याने आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मातामृत्यू रोखण्यासाठी विविध योजना, नियमित तपासण्या आणि संदर्भसेवा राबविल्या जात असतानाही घटना घडल्याने त्यांच्या अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. चिखलदरा तालुक्यातील टेंब्रूसोंडा प्राथमिक आरोग्यकेंद्रांतर्गत सती येथील सात महिन्यांच्या गर्भवती मातेचा, तर धारणी तालुक्यातील धिंगऱ्या येथील मातेचा मृत्यू झाला. सलग दोन मातामृत्यूमुळे मेळघाटातील दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्थेची स्थिती पुन्हा चर्चेत आली आहे.
दुर्गम आणि आदिवासी भागातील गर्भवती महिलांना वेळेवर तपासणी, उपचार तसेच प्रकृती गंभीर झाल्यास पुढील उपचारासाठी संदर्भसेवा उपलब्ध करून देणे ही आरोग्य यंत्रणेची जबाबदारी आहे. मात्र, या दोन्ही घटनांमुळे गर्भवती महिलांच्या आरोग्यसेवेतील नियोजन आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीचा आढावा घेण्याची गरज निर्माण झाली आहे. सती येथील मातेचा वेळेवर प्राथमिक उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे मातेची वेळेत तपासणी झाली होती का, प्रकृती गंभीर झाल्यानंतर योग्य वेळी पुढील उपचारासाठी संदर्भीत करण्यात आले का? आणि रुग्णवाहिका व संदर्भसेवा वेळेत उपलब्ध झाली का? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या मृत्यूची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून उपचारातील प्रत्येक टप्प्याची तपासणी करण्याची मागणी होत आहे. माता व बालमृत्यू रोखण्यासाठी गर्भवती महिलांची नोंदणी, नियमित तपासण्या, जोखमीच्या गर्भधारणेची ओळख आणि वेळेवर संदर्भसेवा यावर भर दिला जातो. मात्र, मातामृत्यूच्या घटना सुरूच असल्याने या योजनांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचे मूल्यमापन करण्याची गरज आहे. दोन्ही मातामृत्यूंची निष्पक्ष चौकशी करून मृत्यूचे नेमके कारण, उपचारातील विलंब अथवा त्रुटी आणि त्यासाठी जबाबदार घटक निश्चित करावेत, अशी मागणी होत आहे. दोष आढळल्यास कारवाईसोबतच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी दुर्गम भागातील आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्याची गरज आहे.
चिखलदरा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक नायडू यांनी सांगितले की, आहाड येथील माता सती गावातील आईकडे आली होती. रात्री तिची प्रकृती अचानक बिघडून तिला झटके आले. मात्र, कुटुंबीयांनी याबाबत माहिती दिली नाही. दुसऱ्या दिवशी आशासेविकेला माहिती मिळताच तिला टेंब्रूसोंडा प्राथमिक आरोग्यकेंद्रात आणण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने अचलपूर येथे संदर्भीत करण्यात आले. मात्र, अचलपूरकडे नेत असतानाच रस्त्यात तिचा मृत्यू झाला.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी