डफरीनचे दोन अतिदक्षता विभाग तातडीने सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली
अमरावती, 29 ऑगस्ट (हिं.स.)। जिल्हा स्त्री रुग्णालय अर्थात डफरीनमधील उर्वरित अतिदक्षता विभाग तातडीने सुरू करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. शुक्रवारी रुग्णालय प्रशासनासह संबंधित विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी संयुक्
डफरीनचे दोन अतिदक्षता विभाग तातडीने सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली


अमरावती, 29 ऑगस्ट (हिं.स.)। जिल्हा स्त्री रुग्णालय अर्थात डफरीनमधील उर्वरित अतिदक्षता विभाग तातडीने सुरू करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. शुक्रवारी रुग्णालय प्रशासनासह संबंधित विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त बैठक घेऊन बंद असलेल्या अतिदक्षता विभागांची प्रत्यक्ष पाहणी केली. सध्या या विभागांमध्ये स्वच्छतेसह आवश्यक तांत्रिक कामे करण्यात येत आहेत.

डफरीन रुग्णालयात नवजात शिशू अतिदक्षता विभाग (एनआयसीयू) व विशेष नवजात शिशू अतिदक्षता विभाग (एसएनसीयू) मिळून तीन अतिदक्षता विभाग कार्यरत होते. मात्र, यापैकी एका विभागात व्हेंटिलेटरचा स्फोट झाल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव तिन्ही विभाग बंद करण्यात आले आहेत. दरम्यान, रुग्णालयात नव्याने जन्म घेणाऱ्या बाळांची गैरसोय होऊ नये आणि त्यांना तातडीची वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी स्फोटग्रस्त विभाग वगळता उर्वरित दोन अतिदक्षता विभाग सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक तथा वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद पवार, डफरीनच्या डॉ. प्रीती इंगळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रतिक गिरी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत शाखेचे कार्यकारी अभियंता सागर शेंडे यांच्यासह अन्य संबंधित अधिकाऱ्यांची बैठक झाली. अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे पाहणी करून आवश्यक कामांचा आढावा घेतला तसेच हे विभाग किती दिवसांत सुरू करता येतील, याची चाचपणी केली. ---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande