बचत गटातून महिलांची स्वावलंबनाकडे वाटचाल प्रसंगानुरूप वस्तुची विक्री; इतरांनाही मिळाला रोजगार
यवतमाळ, 29 ऑगस्ट (हिं.स.)। एकेकाळी केवळ घराच्या चार भिंतीत मर्यादित असलेल्या ग्रामीण महिलांनी आज बचत गटांच्या माध्यमातून स्वावलंबनाची नवी ओळख निर्माण केली आहे. वणी तालुक्यातही अनेक महिला बचत गटाच्या महिला वर्षभरातील सण, उत्सव प्रसंगानुरूप उत्पादने
बचत गटातून महिलांची स्वावलंबनाकडे वाटचाल प्रसंगानुरूप वस्तुची विक्री; इतरांनाही मिळाला रोजगार


यवतमाळ, 29 ऑगस्ट (हिं.स.)।

एकेकाळी केवळ घराच्या चार भिंतीत मर्यादित असलेल्या ग्रामीण महिलांनी आज बचत गटांच्या माध्यमातून स्वावलंबनाची नवी ओळख निर्माण केली आहे. वणी तालुक्यातही अनेक महिला बचत गटाच्या महिला वर्षभरातील सण, उत्सव प्रसंगानुरूप उत्पादने निर्माण करुन त्यांची विक्री करताना दिसत आहे. बचत गटाच्या महिलांनी नुकतेच स्वातंत्र्यदिनासाठी तिरंगा व ईतर साहित्य तर रक्षाबंधन सणाला राखी विक्रीतून उत्पन्न मिळविले आहे. वणी तालुक्यात महिलांचे शेकडो बचत गट स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिला शेतीपूरक व्यवसाय, लघुउद्योग आणि विविध उत्पादनांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत. यामुळे केवळ त्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न वाढत नाही, तर गावाच्या विकासालाही हातभार लागत आहे. दर महिन्याला थोडी-थोडी बचत करण्यापासून सुरू झालेला हा प्रवास आज उद्योग उभारण्यापर्यंत पोहोचला आहे. विविध क्षेत्रांत महिला यशस्वीपणे काम करत आहेत. अनेक बचत गटांनी स्थानिक बाजारपेठेसह ऑनलाइन विक्रीचाही मार्ग स्वीकारण्यास सुरवात केली आहे. बचत गटांमुळे महिलांमध्ये आर्थिक शिस्त, नेतृत्वगुण आणि आत्मविश्वास वाढला आहे. बँक व्यवहार, कर्ज व्यवस्थापन, व्यवसाय नियोजन आणि समूहाने निर्णय घेण्याची क्षमता विकसित होत आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत अनेक महिलांनी स्वतःचा छोटा उद्योग सुरू केला असून इतर महिलांनाही रोजगार उपलब्ध करून दिला आहे. वणी तालुक्यातील अनेक गावांमध्ये महिला बचत गट ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण, जलसंधारण, आरोग्य जनजागृती, व्यसनमुक्ती आणि मुलींच्या शिक्षणासाठीही सक्रिय भूमिका बजावत आहेत. आर्थिक सक्षमीकरणाबरोबरच सामाजिक परिवर्तनाचे कार्यही या महिला करत असल्याने त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. आजची ग्रामीण महिला केवळ गृहिणी नाही, तर ती यशस्वी उद्योजिका, कुटुंबाचा आर्थिक आधार आणि समाजपरिवर्तनाची वाहक बनली आहे. महिलांच्या जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासामुळे ‘बचत गट’ ही संकल्पना आता केवळ बचतीपुरती मर्यादित राहिलेली नाही. ती ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण आणि स्वावलंबी भारताच्या दिशेने टाकलेले एक मजबूत पाऊल ठरत आहे.

उमेद प्रकल्प महिलांना आधार वणी नगर परिषद अंतर्गत उमेद प्रकल्प महिलांना आधार ठरत आहे. या प्रकल्पांतर्गत सोनचैरय्या शहर उपजीविका केंद्राची स्थापना केली गेली आहे. या प्रकल्पाच्या संयोजिका पौर्णिमा शिरभाते या बचत गटांच्या महिलांना व्यवसायाचे मार्गदर्शन तसेच भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी मदत करीत असल्याने अनेक असहाय महिला देखील स्वावलंबी झाल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande