रा.स्व. संघाचे पोलादपुरात युवा संमेलन; एसपी आँचल दलाल प्रमुख अतिथी
रायगड, 29 ऑगस्ट (हिं.स.)। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रायगड विभागाच्या वतीने ‘नवे पर्व युवा सर्व’ या संकल्पनेतून पोलादपूर येथे १ सप्टेंबर रोजी युवा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहात होणाऱ्या या संमेलनास रायगड जिल्ह्या
Youth-Conference-in-Poladpur-b


रायगड, 29 ऑगस्ट (हिं.स.)। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रायगड विभागाच्या वतीने ‘नवे पर्व युवा सर्व’ या संकल्पनेतून पोलादपूर येथे १ सप्टेंबर रोजी युवा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहात होणाऱ्या या संमेलनास रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आँचल दलाल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. आयोजकांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रिकेतून ही माहिती देण्यात आली आहे.

युवा वर्गामध्ये विविध सामाजिक विषयांबाबत जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनाचे आयोजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रायगड विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. संघाचे रायगड विभाग प्रचार प्रमुख तसेच राज्याच्या वित्त विभागाचे उपसंचालक आनंद बिंदू माधव जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होणार आहे.

दुपारी साडेबारा ते अडीच वाजेपर्यंत संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थितांसाठी अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले असून, त्यानंतर सामूहिक पखवाज वादन होणार आहे. यानंतर प्रमुख अतिथी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांचे मार्गदर्शन युवा वर्गाला लाभणार आहे.

पोलादपूर तालुक्यातील युवा वर्गाने मोठ्या संख्येने या संमेलनास उपस्थित राहावे, असे आवाहन पोलादपूर तालुका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने करण्यात आले आहे. युवा शक्तीला संघटित करून सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने हे संमेलन महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande