
पुणे, 29 ऑगस्ट (हिं.स.)। हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो सुरू झाल्यानंतर राजीव गांधी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) पुढाकार घेतला आहे. मेट्रो स्थानकांपासून थेट आयटी कंपन्यांपर्यंत पादचारी उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव असून, त्यामुळे कर्मचाऱ्यांना रस्त्यावर उतरून कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही.
सध्या इन्फोसिस आणि एम्बसी क्वाड्रन बिझनेस पार्कने या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. इन्फोसिसकडून मेट्रो स्थानक क्रमांक ४ आणि ५ ला जोडणारे पादचारी उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन आहे. तर एम्बसी क्वाड्रन बिझनेस पार्ककडून स्थानक क्रमांक २ ला जोडणारा पूल उभारण्यात येणार आहे. एमआयडीसीने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), टेक महिंद्रा आणि बिर्लासॉफ्ट यांनाही त्यांच्या कंपन्यांना मेट्रो स्थानकांशी जोडण्यासाठी पादचारी उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे. या सुविधेमुळे आयटी पार्कमधील सुमारे एक लाख कर्मचाऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. पादचारी उड्डाणपुलांसाठी आवश्यक जागा एमआयडीसीकडून उपलब्ध करून दिली जाणार आहे. मेट्रो स्थानकातून थेट कंपनीत आणि कंपनीतून थेट मेट्रो स्थानकात जाता येणार असल्याने कर्मचाऱ्यांचा वेळ वाचणार आहे. त्याचबरोबर रस्त्यावर पादचाऱ्यांची आणि वाहनांची होणारी गर्दी कमी होण्यासही मदत होईल, असा दावा एमआयडीसीकडून करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु