
रत्नागिरी, 29 ऑगस्ट (हिं.स.) । राजापूर तालुक्यातील नाणार, कुंभवडे आणि सागवे परिसरात प्रस्तावित असलेल्या बॉक्साइट खनिज उत्खनन प्रकल्पाला स्थानिकांचा तीव्र विरोध असून, या विरोधाला व्यापक स्वरूप देण्यासाठी रविवारी (दि. ३० ऑगस्ट) सागवे येथे सर्वपक्षीय भव्य जनसभेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत आणि राजापूरचे आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत ही सभा होणार आहे.
सागवे येथील जनता विद्यालयात दुपारी २ वाजता ही सभा आयोजित करण्यात आली आहे. आगामी ७ सप्टेंबर रोजी प्रस्तावित असलेल्या पर्यावरणविषयक जाहीर जनसुनावणीच्या पार्श्वभूमीवर या सभेला विशेष आहे.
मे. सोशियेदादे दि फोमेंटो इंडस्ट्रियल प्रायव्हेट लिमिटेड (मडगाव, गोवा) यांच्या प्रस्तावित ‘नाणार बॉक्साइट ब्लॉक’ प्रकल्पासाठी १४४.९०५ हेक्टर क्षेत्रात प्रतिवर्ष ०.९ दशलक्ष टन क्षमतेने बॉक्साइट उत्खनन करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता सागवे (घोडेपोई) येथील श्री कात्रादेवी मंगल कार्यालयात पर्यावरणविषयक जाहीर जनसुनावणी घेण्यात येणार आहे.
प्रस्तावित प्रकल्पामुळे परिसरातील जमीन, पाणीस्रोत, शेती, पर्यावरण आणि भविष्यातील पिढ्यांवर होणाऱ्या संभाव्य परिणामांचा विचार करून स्थानिकांनी या प्रकल्पाला विरोधाची भूमिका घेतली आहे. या विरोधाला सर्वपक्षीय पाठिंबा मिळत असून, गावाची जमीन, पाणी, पर्यावरण आणि शेतीचे रक्षण करण्यासाठी एकत्रितपणे आवाज उठविण्याचा निर्धार पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी आपण स्थानिक जनतेच्या बाजूने असून, या प्रकल्पाला आपला विरोध असल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनीही प्रकल्पाबाबत स्थानिक जनतेची जी भूमिका असेल, त्या भूमिकेला आपले समर्थन असेल, असे जाहीर केले आहे.
७ सप्टेंबरच्या जनसुनावणीपूर्वी शक्तिप्रदर्शन
जनसुनावणीच्या पार्श्वभूमीवर रविवारी आयोजित करण्यात आलेल्या सभेत प्रकल्पाला असलेला स्थानिकांचा विरोध ठामपणे मांडण्यात येणार आहे. तसेच पुढील काळातील प्रकल्पविरोधी लढ्याची दिशा निश्चित करण्याबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे.
ही सभा कोणत्याही एका राजकीय पक्षाची नसून सर्वपक्षीय असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सभेत राजकारण आणू नये किंवा राजकीय आरोप-प्रत्यारोप करू नयेत, असे आवाहन पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी