
पुणे, 29 ऑगस्ट (हिं.स.)। पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी गेल्या चार दशकांत तब्बल २३ आराखडे तयार करण्यात आले. मात्र, त्यानंतरही पुणेकरांच्या वाहतुकीच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही. सायकल मार्गांपासून उड्डाणपुलांपर्यंत, वाहनतळांपासून पुणे-पिंपरी चिंचवडच्या एकत्रित वाहतूक व्यवस्थेपर्यंत आणि मेट्रोपर्यंत विविध योजना आखण्यात आल्या. त्यातील मेट्रोचा अपवाद वगळता अनेक आराखड्यांची अंमलबजावणी कागदावरच राहिली.आता पुणे महापालिकेने शहरातील वाहतूक व्यवस्थेचा पुन्हा अभ्यास करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली आहे.
यावेळी वाहतुकीचा तुकड्या-तुकड्यांत विचार न करता संपूर्ण शहराचा सर्वंकष वाहतूक आराखडा तयार केला जाणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. त्यामुळे नव्या अभ्यासातून तरी पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ठोस उपाय निघणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महापालिकेने १९८१ ते २००९ या कालावधीत वाहतूक व्यवस्थेसंदर्भात तब्बल २३ आराखडे तयार केले. त्यापैकी काही महत्त्वाच्या योजनांमध्ये १९८१ मधील सायकल मार्गांचे जाळे, १९९४ मधील शहरातील लांब पल्ल्याच्या वाहतुकीचा आराखडा, १९९६ मधील वाहनतळ योजना आणि १९९८ मधील उड्डाणपुलांच्या शक्यता पडताळणीचा अभ्यास यांचा समावेश होता. त्यानंतर २००० मध्ये पीएमटी आणि पीसीएमटीच्या समन्वयाचा अभ्यास करण्यात आला. २००४ मध्ये स्काय बस मेट्रोचा प्रकल्प अहवाल तयार करण्याबरोबरच पुणे आणि पिंपरी-चिंचवडची वाहतूक व्यवस्था एकत्रित करण्याचा अभ्यास झाला. २००८ मध्ये गतिमान वाहतुकीसाठी सविस्तर योजना, तर २००९ मध्ये मेट्रोचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला. या प्रमुख आराखड्यांव्यतिरिक्त विविध विषयांवर छोटे-मोठे आराखडेही तयार करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु