
सोलापूर, 29 ऑगस्ट (हिं.स.)। दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या सांगोला तालुक्यात पाण्यासाठी शेतकऱ्यांनी दाखविलेल्या अभूतपूर्व एकजुटीला अखेर यश आले आहे. टेंभू उपसा योजनेचे पाणी मान नदीत सोडल्यानंतर ते तालुक्यातील शेवटचे गाव असलेल्या मेथवडेपर्यंत पोहोचले आहे. तसेच नीरा उजवा कालव्याच्या फाटा क्रमांक पाचलाही पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. पाण्याच्या प्रश्नावर पक्ष, गट आणि राजकीय मतभेद बाजूला ठेवून शेतकरी एकत्र आले. त्यामुळेच हा लढा यशस्वी झाल्याची भावना लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
सांगोल्यातील शेतकरी म्हटले की हक्काच्या पाण्यासाठीचा संघर्ष हे समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे. तालुक्यात निवडणुका आल्या की पाण्याचा प्रश्न ऐरणीवर येतो आणि नेत्यांकडून आश्वासनांची मालिकाही सुरू होते. यंदा मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचा पाण्यासाठीचा संघर्ष अधिक तीव्र झाला. पावसाने पाठ फिरवल्याने तालुक्यातील खरीप पिके धोक्यात आली होती. पावसाअभावी पिकांना पाण्याची गरज असतानाच फळबागांवरही संकट ओढवले. डाळिंबाच्या बहार धरलेल्या बागा पाण्याअभावी सुकण्याच्या मार्गावर होत्या. ऊस, आंबा, पेरू, ड्रॅगन फ्रूट यांसह अन्य फळपिकांनाही पाण्याची मोठी आवश्यकता होती. त्यामुळे नदी आणि कालव्याचे पाणी मिळणे हा केवळ सिंचनाचा प्रश्न न राहता हातातोंडाशी आलेली पिके वाचविण्याचा प्रश्न बनला होता.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पाण्याच्या प्रश्नासाठी विविध पातळ्यांवर आंदोलने केली. राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी मात्र पक्षीय राजकारण बाजूला ठेवून पाण्यासाठी एकत्रित लढा उभारला. या एकजुटीच्या प्रयत्नांना यश येत टेंभू योजनेचे पाणी मान नदीतून मेथवडेपर्यंत पोहोचले, तर नीरा उजवा कालव्याच्या फाटा क्रमांक पाचला पाणी सोडण्याचा निर्णय झाला. त्यामुळे दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड