
सोलापूर, 29 ऑगस्ट (हिं.स.)। सोलापूर जिल्हा जात प्रमाणपत्र समितीच्या तत्कालीन अध्यक्षा मंजूषा मिस्कर यांनी सदर बझार पोलिसांत सहा जणांविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्याच्या तपासाला आता नवे वळण मिळाले आहे. मिस्कर यांनी पोलिसांकडे ४२ ऑडिओ क्लिप आणि सुमारे एक हजार पानी कागदपत्रांची झेरॉक्स प्रत सादर केली आहे. या पुराव्यांच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.मिस्कर यांनी ९ जून रोजी सदर बझार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना या वादाचा उल्लेख केल्याने मिस्कर यांची फिर्याद पुन्हा चर्चेत आली आहे.
मंजूषा मिस्कर यांनी २८ मार्च रोजी सोलापूर जिल्हा जात पडताळणी समितीच्या अध्यक्षा म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यापूर्वी १५ मार्च रोजी उपायुक्त रविंद्र कदम पाटील यांनी समितीचे सदस्य म्हणून पदभार स्वीकारला होता. दोन्ही अधिकारी रुजू झाल्यानंतर काही दिवसांतच कार्यालयीन कामकाजावरून त्यांच्यात वाद सुरू झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. २७ मार्च ते २७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत कदम पाटील यांच्यासह अन्य पाच जणांनी शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा आरोप करण्यात आला आहे.
वारंवार सूचना देऊनही संबंधितांनी संगनमत करून आदेशांचे पालन केले नाही, असा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच प्रशासकीय कामकाजात अडथळे निर्माण करणे, वरिष्ठांच्या मान्यतेनंतरही ऑनलाइन प्रमाणपत्र वितरण प्रक्रियेत जाणीवपूर्वक विलंब करणे, जात पडताळणीची प्रकरणे प्रलंबित ठेवणे आणि आदेशांचे पालन न करणे, असे आरोपही करण्यात आले आहेत.
मिस्कर यांनी संबंधितांकडून अश्लील आणि लिंगभेदी वक्तव्ये करून मानसिक त्रास दिल्याचा आरोपही केला आहे. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पोलिसांकडे ऑडिओ क्लिप आणि मोठ्या प्रमाणात कागदपत्रे सादर केली आहेत.आता या ऑडिओ क्लिप तसेच सादर केलेल्या कागदपत्रांची पोलिसांकडून पडताळणी केली जात असून, त्यातील तथ्य तपासाच्या माध्यमातून स्पष्ट होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड