
सोलापूर, 29 ऑगस्ट (हिं.स.)। सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रमुख स्रोत असलेल्या आणि १५४ वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या एखरूख अर्थात हिप्परगा तलावावर आता सौरऊर्जेची निर्मिती केली जाणार आहे. तलावाच्या पाण्याच्या पृष्ठभागाचा वापर करून वीज निर्मिती करण्याचा हा जलसंपदा विभागाच्या इतिहासातील पहिलाच प्रयोग ठरणार आहे. हिप्परगा तलावाचे एकूण बुडीत क्षेत्र १ हजार ६२६ हेक्टर असून, त्यापैकी तब्बल १०२ हेक्टर म्हणजे सुमारे २५० एकर जलक्षेत्र तरंगत्या सौरऊर्जा प्रकल्पासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
या प्रकल्पात पाण्यावर तरंगणाऱ्या विशेष संरचनेवर सौर पॅनल बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रकल्पाच्या युनिटसाठी आवश्यक असलेली काही जमीनही उपलब्ध करून दिली जाणार आहे. जलाशयाच्या पाण्याच्या पृष्ठभागाचा अन्य कोणताही मोठा वापर न करता त्यावर सौरऊर्जा निर्मिती करण्याचा हा अभिनव प्रयोग मानला जात आहे. या सौरऊर्जा प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या विजेच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे एक कोटी रुपयांचा महसूल मिळण्याचा अंदाज आहे. प्रकल्पाचा कालावधी २५ वर्षांचा असल्याने या कालावधीत हिप्परगा तलावावरील सौर प्रकल्पातून सुमारे २५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड