चौघांचा सशस्त्र हल्ला; तलवारीचे वार करून सोन्याची चैन व ८० हजारांची लूट
रायगड, 03 ऑगस्ट (हिं.स.)। : पेण तालुक्यातील कुरमुली येथील एका फॉर्महाऊसमध्ये पूर्वीच्या वादातून चौघांनी मिळून एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. मारहाणीनंतर फिर्यादीच्या गळ्यातील पाच तोळ्यांची सोन्याची चैन तसेच खिशातील ८० हजा
Armed-attack-by-four-individua


Armed-attack-by-four-individua


रायगड, 03 ऑगस्ट (हिं.स.)। : पेण तालुक्यातील कुरमुली येथील एका फॉर्महाऊसमध्ये पूर्वीच्या वादातून चौघांनी मिळून एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. मारहाणीनंतर फिर्यादीच्या गळ्यातील पाच तोळ्यांची सोन्याची चैन तसेच खिशातील ८० हजार रुपयांची रोकड लुटून आरोपींनी जीवे मारण्याची धमकी देत घटनास्थळावरून पलायन केले. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुरमुली येथील त्यांच्या फॉर्महाऊसमधील किचनमध्ये जेवणासाठी बसले असताना पूर्ववैमनस्यातून आरोपी लोखंडी रॉड, लोखंडी पाईप, लाकडी दांडका आणि तलवार घेऊन तेथे पोहोचले. आरोपींनी प्रथम स्वयंपाकी व त्याच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत बाहेर हाकलून दिले. त्यानंतर फिर्यादीवर लोखंडी रॉड, पाईप व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आली. एका आरोपीने तलवारीने उजव्या पायावर व हातावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले.

मारहाणीदरम्यान मुख्य आरोपीने रिव्हॉल्वर फिर्यादीच्या कपाळाला लावून नंतर तोंडात घालून ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याच वेळी खाली पडलेली ८० हजार रुपयांची रोकड आणि गळ्यातील पाच तोळ्यांची सोन्याची चैन आरोपींनी जबरदस्तीने हिसकावून घेतली. तसेच पुन्हा आमच्या नादी लागल्यास तुला व तुझ्या कुटुंबाला ठार मारू, अशी धमकी देत आरोपी पसार झाले.

या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १८६/२०२६ दाखल करण्यात आला असून शस्त्र अधिनियम, १९५९ तसेच भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील विविध कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande