जळगाव पोलिसांकडून 3 चोरट्यांना अटक
जळगाव, ३ ऑगस्ट (हिं.स.) : जळगाव जिल्ह्यात वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहर पोलिसांनी तत्पर कारवाई करत चोरीचा एक गुन्हा अवघ्या काही दिवसांत उघडकीस आणला. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेली
जळगाव पोलिसांकडून 3 चोरट्यांना अटक


जळगाव, ३ ऑगस्ट (हिं.स.) : जळगाव जिल्ह्यात वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहर पोलिसांनी तत्पर कारवाई करत चोरीचा एक गुन्हा अवघ्या काही दिवसांत उघडकीस आणला. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेली १० हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील चोरीच्या गुन्ह्यांचा तपास वेगाने करण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात आली होती. त्यानुसार जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनी गुन्हे शोध पथकाची विशेष टीम तयार करून तपास सुरू केला.

३० जुलै २०२६ रोजी दुपारी प्रकाश मेडिकल चौक ते महात्मा फुले मार्केटदरम्यान टीप-टॉप वेअर दुकानासमोर फिर्यादी जावेद खान रसूल खान (रा. मासूमवाडी, जळगाव) यांच्या पँटच्या खिशातून अज्ञात चोरट्यांनी १० हजार रुपयांची रोकड चोरून नेली होती. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान गुप्त माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी अरशद शेख रज्जाक उर्फ चिकू शाहरुख (वय ३२), फारुख शेख हनीफ (वय २८) आणि शाकीर शेख शकील उर्फ घाऱ्या राजू (वय ३०, सर्व रा. गेंदालाल मिल परिसर, जळगाव) यांना ताब्यात घेतले.

पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या उपस्थितीत झालेल्या चौकशीत तिघांनी चोरीची कबुली दिली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेली १० हजार रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. पुढील तपास जळगाव शहर पोलीस करीत आहेत.

---------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande