पत्नीचा अमानुष छळ; संमतीशिवाय १० वेळा गर्भपात केल्याचा आरोप
रायगड, 03 ऑगस्ट (हिं.स.)। : महाड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विवाहित महिलेचा तब्बल १८ वर्षे मानसिक, शारीरिक व आर्थिक छळ करून तिच्या इच्छेविरुद्ध दबाव टाकत १० वेळा गर्भपात घडवून आणल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महाड शहर पोलिसांनी पती
पत्नीचा अमानुष छळ; संमतीशिवाय १० वेळा गर्भपात केल्याचा आरोप


रायगड, 03 ऑगस्ट (हिं.स.)। : महाड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विवाहित महिलेचा तब्बल १८ वर्षे मानसिक, शारीरिक व आर्थिक छळ करून तिच्या इच्छेविरुद्ध दबाव टाकत १० वेळा गर्भपात घडवून आणल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महाड शहर पोलिसांनी पतीविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे व आरोपीचे लग्न ९ ऑक्टोबर २००८ रोजी झाले. त्यानंतर आरोपीने महिला माहेरून काहीच आणले नाही, तसेच ती नोकरी करत असल्याने तिच्याकडून वारंवार पैशांची मागणी केली. घरखर्च आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्चही जबरदस्तीने तिच्याकडूनच उचलून घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, आरोपीने विवाहबाह्य संबंध ठेवत पत्नीला चाकूचा धाक दाखवून घरातील भांडी, झाडू, कंबरेचा बेल्ट तसेच हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तिचे डोके भिंतीवर आपटून गळा दाबण्याचा प्रयत्न केला तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीने म्हटले आहे.

याशिवाय, २००९ ते २०२२ या कालावधीत वेगवेगळी कारणे सांगून दबाव टाकत पत्नीच्या संमतीशिवाय एकूण १० वेळा गर्भपात घडवून आणल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी महाड (शहर) पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. १२३/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ८५, ८९, ३५१(२), ११५(२) व ३५२ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास मसपोनि विद्या राऊत करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande