जन्माची साथ अखेरच्या श्वासापर्यंत; सख्खे भाऊ एकाच वेळी काळाच्या पडद्याआड
लातूर, 30 ऑगस्ट (हिं.स.)। एकाच घरात आयुष्यभर सुख-दुःखाची सोबत करणाऱ्या दोन सख्ख्या भावांची जीवनयात्राही काळाने एकाच क्षणी संपविल्याची हृदयद्रावक घटना तालुक्यातील केळगाव येथे शनिवारी (२९ ऑगस्ट) घडली. भाऊराव निवृत्ती राठोडकर आणि माणिकराव निवृत्ती रा
सख्खे भाऊ एकाच वेळी काळाच्या पडद्याआड


लातूर, 30 ऑगस्ट (हिं.स.)।

एकाच घरात आयुष्यभर सुख-दुःखाची सोबत करणाऱ्या दोन सख्ख्या भावांची जीवनयात्राही काळाने एकाच क्षणी संपविल्याची हृदयद्रावक घटना तालुक्यातील केळगाव येथे शनिवारी (२९ ऑगस्ट) घडली. भाऊराव निवृत्ती राठोडकर आणि माणिकराव निवृत्ती राठोडकर या दोन्ही भावांचा जवळपास एकाच वेळी मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

भाऊराव राठोडकर हे वयोवृद्ध असून आजारी होते. शनिवारी त्यांची प्रकृती अचानक खालावल्याने कुटुंबीय व नातेवाईक त्यांच्या भोवती जमले होते. भावाची प्रकृती गंभीर होत असल्याचे पाहून माणिकराव राठोडकर यांना अश्रू अनावर झाले. त्याचवेळी त्यांना अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.

कुटुंबीयांनी त्यांना तातडीने वाहनातून रुग्णालयाकडे नेण्यास सुरुवात केली. मात्र, केळगावपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावरच माणिकराव यांनी अखेरचा श्वास घेतला. दुसरीकडे, घरी असलेल्या त्यांच्या सख्ख्या भावाचीही त्याच सुमारास प्राणज्योत

मालवली. भावाला रुग्णालयात नेत असतानाच दुसऱ्या भावाच्या निधनाची बातमी कुटुंबीयांवर वज्राघातासारखी कोसळली. ज्या भावाच्या प्रकृतीसाठी सारे जण घरात जमले होते, त्याच क्षणी दुसऱ्या भावानेही जगाचा निरोप घेतला. आयुष्यभराची सोबत अखेरच्या क्षणीही कायम राहिल्याने या घटनेने केळगावकरांचे डोळे पाणावले.

दोन्ही भावांवर शनिवारी केळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. स्व. भाऊराव राठोडकर यांच्या पश्चात तीन मुले, तीन सुना व नातवंडे असा परिवार आहे. तर स्व. माणिकराव राठोडकर यांच्या पश्चात एक मुलगा, सून व दोन नातू असा परिवार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande