
दहिगाव रेचा सह तालुक्यात शेतकरी अडचणीत तहसीलदार यांना माहिती असूनही दुर्लक्ष?
अमरावती, 31 ऑगस्ट (हिं.स.)। तालुक्यातील दहिगाव रेचा सह संपूर्ण परिसरात 'इ-पीक पाहणी' ची प्रक्रिया पूर्णपणे खोळंबली आहे. शासकीय पातळीवर ११ ऑगस्टपासून इ-पीक पाहणीचा टप्पा सुरू झाला असला, तरी तांत्रिक त्रुटी आणि प्रशासकीय ढिसाळपणामुळे शेतकरी आपल्या पिकांची नोंदणी करण्यापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे. शेतकरी चिंतेत सापडले असून तहसील प्रशासन मात्र या समस्येकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
शासनाने पीक पाहणीची सर्व प्रक्रिया डिजिटल केली असली, तरी प्रत्यक्षात 'इ-पीक पाहणी' ॲप चालत नसल्याच्या तक्रारींचा पूर आला आहे. शेतकरी स्वतः मोबाईलवरून पीक नोंदणी करू शकत नाहीत. सर्वर डाऊन असणे, लोकेशन न मिळणे आणि ॲप वारंवार हँग होणे यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. वेळेत पीक नोंद झाली नाही, तर सातबारा उतारा पिकांच्या नोंदीविना कोरा राहील आणि यामुळे पुढील काळात शासकीय योजना, पीक विमा, आणि नुकसान भरपाई मिळण्यात मोठ्या अडचणी निर्माण होतील. तसेच स्थानिक पातळीवर पोलीस पाटलांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.
इ-पीक पाहणीची नोंदणी शासकीय कर्मचाऱ्यांमार्फत करण्याची जबाबदारी देण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात हे काम पोलीस पाटलांवर सोपवण्यात आले आहे. आधीच पोलीस प्रशासनाचा समन्वय आणि गावातील कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस पाटलांवर असते. त्यातच सध्या सण-उत्सवांचे दिवस सुरू असल्याने गावोगावी पोलीस पाटलांना २४ तास सतर्क राहावे लागत आहे. अशा परिस्थितीत पोलीस पाटलांनी कायदा व सुव्यवस्थेकडे लक्ष द्यावे की शेतकऱ्यांच्या इ-पीक पाहणीसाठी शेतात फिरत राहावे, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अतिरिक्त भारामुळे पोलीस पाटीलही त्रस्त झाले आहेत.
तर तहसीलदार कधी जागे होणार?११ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या प्रक्रियेला १५ दिवसांहून अधिक काळ उलटूनही अद्याप तांत्रिक अडचणींवर मात करण्यात आलेली नाही. प्रशासकीय पातळीवर या गोंधळाकडे सपशेल दुर्लक्ष केले जात असून शेतकरी चिंतेत आणि तहसील प्रशासन झोपेत अशीच काहीशी परिस्थिती अंजनगाव सुर्जी तालुक्यात पाहायला मिळत आहे. महसूल विभागाने व तहसीलदारांनी तात्काळ या समस्येची दखल घेऊन ॲपमधील तांत्रिक अडचणी दूर कराव्यात, तसेच पोलीस पाटलांवरील अतिरिक्त ताण कमी करून या कामासाठी स्वतंत्र यंत्रणा किंवा मदतनीस उपलब्ध करून द्यावेत, अशी रास्त मागणी दहिगाव रेचा येथील शेतकऱ्यांनी केली आहे. आता तरी तहसीलदार या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा देणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी