
नवी दिल्ली, 30 ऑगस्ट (हिं.स.) केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया, भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, कुस्तीपटू संग्राम सिंह आणि अभिनेत्री मधुरिमा तुली यांनी आज नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये फिट इंडिया संडे ऑन सायकलच्या राष्ट्रीय क्रीडा दिन विशेष उपक्रमाचे नेतृत्व केले. ब्रिक्सच्या सहकार्याने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. देशभरातील 25 हजारांहून अधिक ठिकाणी एकाच वेळी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. साप्ताहिक सायकलिंग चळवळीतील हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरला.
भारत 12 आणि 13 सप्टेंबर रोजी भारत मंडपम येथे 18 व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन करत असल्यामुळे फिट इंडिया संडे ऑन सायकलच्या 88 व्या आवृत्तीला विशेष महत्त्व आहे, असे डॉ. मांडविया यांनी सांगितले. 12 आणि 13 सप्टेंबर रोजी होणाऱ्या शिखर परिषदेत सहभागी होणाऱ्या ब्रिक्समधील मान्यवर आणि सदस्यांना या आठवड्याची आवृत्ती समर्पित करण्यात आली आहे. आज त्यांचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे, असेही ते म्हणाले. सायकल चालवल्यामुळे तंदुरुस्ती वाढते, प्रदूषण कमी होते आणि वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत होते, असे सांगून त्यांनी सायकल चालवण्याचे तीन फायदे अधोरेखित केले. नागरिकांनी सायकल चालवणे आपल्या साप्ताहिक दिनक्रमाचा भाग करून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
देशभरातील 25 हजारांहून अधिक ठिकाणी संडेज ऑन सायकलच्या 88 व्या आवृत्तीला सुरुवात झाली आहे. देशभरात सायकलिंगची आवड वाढत असून, संडेज ऑन सायकल हा उपक्रम लोकांच्या आवडीचा भाग बनत आहे, असे ते म्हणाले. आपण सर्वांनी दररोज एक तास मोबाईल आणि संगणकाच्या पडद्यापासून दूर जाऊन बाहेर पडावे, सायकल चालवावी, खेळ खेळावेत आणि स्वतःला तंदुरुस्त ठेवावे, असे डॉ. मांडविया यांनी सांगितले.
ब्रिक्स भागीदार देशांच्या मान्यवर प्रतिनिधींनीही या उपक्रमात सहभाग घेतला. यामध्ये मलेशिया उच्चायोगाच्या प्रभारी अधिकारी शरीफा एझनीदा वफा स्येद झुल्करनैन वफा, व्हिएतनामच्या दूतावासाचे नियुक्त राजदूत त्रिन्ह मिन्ह मन्ह, इंडोनेशियाच्या दूतावासाचे प्रभारी अधिकारी युधो संग्स्को, बेलारूसच्या दूतावासाचे राजदूत मिखाईल कास्को, क्युबाच्या दूतावासाचे राजदूत हुआन कार्लोस मार्सान अगिलेरा, इथिओपियाच्या दूतावासाचे राजदूत नेबियू टेडला नेगाश आणि रशियाच्या दूतावासाचे मंत्री-सल्लागार आणि उपप्रमुख रोमन बाबुश्किन यांचा समावेश होता.
या कार्यक्रमाला वरिष्ठ सरकारी अधिकारीही उपस्थित होते. यामध्ये क्रीडा विभागाचे सचिव हरी रंजन राव, युवा व्यवहार विभागाचे सचिव सुनील पालिवाल आणि परराष्ट्र मंत्रालयातील आर्थिक संबंध विभागाचे सचिव सुधाकर दलेला यांचा समावेश होता.
पद्मश्री गौतम गंभीर यांनी सायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. फिट इंडिया अंतर्गत सरकारने आयोजित केलेला हा उपक्रम अत्यंत विशेष आहे. भारत जितका तंदुरुस्त राहील, तितका तो अधिक बळकट आणि अधिक आत्मनिर्भर बनेल, असा माझा विश्वास आहे, त्यामुळे हा केवळ एक कार्यक्रम म्हणून न पाहता, एक चळवळ म्हणून पाहिले पाहिजे, असे ते म्हणाले. विशेषतः या कार्यक्रमात सहभागी झालेल्या तरुणांची ही जबाबदारी आहे की, त्यांनी या उपक्रमाचे चळवळीत रूपांतर करण्याचा प्रयत्न केला पाहीजे, आपले तरुण आणि इतर सर्व नागरिक तंदुरुस्त राहतील, याची खात्री करून अधिक तंदुरुस्त आणि मजबूत राष्ट्र घडवावे, असे गंभीर यांनी सांगितले.
नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये ब्रिक्स रन अँड राइड 2026 या उपक्रमाअंतर्गत 5 हजारांहून अधिक जण सहभागी झाले. यामध्ये तरुण, ज्येष्ठ नागरिक आणि ब्रिक्स भागीदार देशांच्या प्रतिनिधींचा समावेश होता. त्यांनी मोठ्या उत्साहाने नृत्य केले, सायकल चालवली आणि विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतला.
आयटीबीपीच्या ब्रास बँडच्या सादरीकरणाने कार्यक्रमाच्या उत्साहात भर पडली. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या दुसऱ्याच दिवशी आणि रविवारी सकाळी हा उपक्रम घेण्यात आल्याने नागरिकांमध्ये तंदुरुस्ती, क्रीडा आणि सक्रिय सहभागाची भावना वाढण्यास मदत झाली. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मांडविया यांच्या संकल्पनेतून फिट इंडिया संडे ऑन सायकल हा उपक्रम सुरू करण्यात आला असून युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया, राहगिरी फाउंडेशन आणि माय भारत यांच्या सहकार्याने हा उपक्रम घेण्यात आला. भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि खेलो इंडिया यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येतो.
देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकाच वेळी सायकलिंग उपक्रम राबवण्यात आला. भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या प्रादेशिक केंद्रांसह, राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रे, भारतीय क्रीडा प्राधिकरणाची प्रशिक्षण केंद्रे, खेलो इंडिया राज्य उत्कृष्टता केंद्रे आणि खेलो इंडिया केंद्रे यांचा यामध्ये सहभाग होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे