गुटखा-तंबाखूची तस्करी उधळली; तिघांना अटक
रायगड, 30 ऑगस्ट (हिं.स.)। महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्या तिघांना कुळगाव पोलिसांनी अटक केली. या कारवाईत पोलिसांनी ५ लाख ३२ हजार ८० रुपयांचा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा तसेच तीन लाख रुपये
Gutkha and tobacco smuggling racket busted; three arrested.


Gutkha and tobacco smuggling racket busted; three arrested.


रायगड, 30 ऑगस्ट (हिं.स.)। महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्या तिघांना कुळगाव पोलिसांनी अटक केली. या कारवाईत पोलिसांनी ५ लाख ३२ हजार ८० रुपयांचा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा तसेच तीन लाख रुपये किमतीचा टेम्पो असा एकूण ८ लाख ३२ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे १०.३५ वाजता कुळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत चव्हाण यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. एका छोट्या हत्ती टेम्पो क्रमांक एमएच-०५/डीजे-४०९१ मधून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा बदलापूर-कर्जत मार्गाने नेला जात असल्याची माहिती मिळाली.

माहितीच्या आधारे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली कुळगाव पोलीस पथकाने बदलापूर-कर्जत रोडवरील वांगणी गावाच्या हद्दीत सापळा रचला. संशयित टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये ५ लाख ३२ हजार ८० रुपये किमतीचा प्रतिबंधित विमल पानमसाला व सुगंधित तंबाखू आढळून आला. यासोबतच तीन लाख रुपये किमतीचा टेम्पो असा एकूण ८ लाख ३२ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

या प्रकरणी नफीस भुरे खान (३२), सद्दाम ऊर्फ अली इक्बाल खान (३२) आणि कयामुद्दीन मुस्तफा दिवाण (१८ वर्षे ७ महिने) यांना अटक करण्यात आली आहे. कुळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २३९/२०२६ अन्वये संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पी. एस. बोंदाडे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande