
नांदेड, 29 ऑगस्ट (हिं.स.)।
नांदेड जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत माळाकोळी पोलिसांनी विनापरवाना रेती वाहतूक करणारा हायवा पकडून तब्बल ३० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
माळाकोळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हायवामधून अवैधरीत्या रेती वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने घटनास्थळी जाऊन नाकाबंदी केली. यावेळी हायवा अडवून तपासणी केली असता त्यामध्ये अंदाजे चार ब्रास रेती आढळून आली.
रेती वाहतुकीसाठी आवश्यक परवाना व कागदपत्रांबाबत चौकशी केली असता संबंधितांकडे कोणतीही वैध कागदपत्रे नसल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून हायवा व रेती असा एकूण ३० लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. माळाकोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०३(२), ३(५) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ मधील कलम ४८(७), ४८(८) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis