
परभणी, 30 ऑगस्ट (हिं.स.)।
शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अफाट कर्तृत्वासह धडाडीपणामुळेच आपण शिवसेनेत प्रवेश करीत आहोत, असे मत परभणीचे प्रथम महापौर प्रताप देशमुख यांनी शिवसेनेने आयोजित केलेल्या शेतकरी व युवक संवाद मेळाव्यातून व्यक्त केले.
येथील स्टेडिअम मैदानावर शिवसेना शिंदे गटाने आयोजित केलेल्या शेतकरी व युवक संवाद मेळाव्यात प्रथम महापौर देशमुख यांनी समर्थक पदाधिकार्यांसह शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीस सोडचिठ्ठी देऊन उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. तत्पूर्वी या पक्षांतराबद्दल या मेळाव्यातून मत व्यक्त करतेवेळी देशमुख यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कर्तृत्वासह धडाडीपणाचे मुक्तकंठाने कौतूक केले. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाच्या माध्यमातून कार्य करतेवेळी शिंदे यांचा करारीपणा, धडाडीपणा आपणास प्रभावित करणारा ठरला, असे नमूद करीत शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच आगामी काळातील राजकीय प्रवासाचा निर्णय घेतला. पदाधिकार्यांसह सदस्यांबरोबर हितगुज करीत परभणीच्या विकासाकरीता शिवसेनेच्या माध्यमातून पूर्ण ताकदिनिशी काम करण्याचा संकल्प सोडला, असे ते म्हणाले.
शिंदे यांचे नेतृत्व व खासदार संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली परभणीच्या विकासाला निश्चित गती मिळेल, असा ठाम विश्वास व्यक्त करतेवेळी आपल्यासोबत परभणी शहर व जिल्ह्यातील काही प्रमुख नेते तसेच माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. आगामी काळातसुध्दा शिंदे गटात मोठ्या प्रमाणावर आजी-माजी लोकप्रतिनिधी सहभागी होतील, असा विश्वासही व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis