पाच लाखांच्या कर्जाचे आमिष दाखवून १२.७४ लाखांची ऑनलाइन फसवणूक
रायगड, 30 ऑगस्ट (हिं.स.)। पाच लाख रुपयांच्या कर्जाचे आमिष दाखवून एका व्यक्तीच्या बँक खात्यातून तब्बल १२ लाख ७४ हजार ३३७ रुपये परस्पर विविध खात्यांमध्ये वर्ग करून ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार मुरूडमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुरूड पोलीस ठाण्या
पाच लाखांच्या कर्जाचे आमिष दाखवून १२.७४ लाखांची ऑनलाइन फसवणूक


पाच लाखांच्या कर्जाचे आमिष दाखवून १२.७४ लाखांची ऑनलाइन फसवणूक


रायगड, 30 ऑगस्ट (हिं.स.)। पाच लाख रुपयांच्या कर्जाचे आमिष दाखवून एका व्यक्तीच्या बँक खात्यातून तब्बल १२ लाख ७४ हजार ३३७ रुपये परस्पर विविध खात्यांमध्ये वर्ग करून ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार मुरूडमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुरूड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तवाडी, शिवाजी चौक, मुरूड येथील फिर्यादी यांच्या मोबाईलवर १२ ऑगस्ट रोजी रात्री अकराच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. संबंधिताने फिर्यादी यांना पाच लाख रुपयांच्या कर्जाची ऑफर असल्याचे सांगितले. फिर्यादी यांना प्रत्यक्षात कर्जाची गरज नसतानाही संशयिताने विविध प्रक्रिया करण्याच्या नावाखाली त्यांची माहिती मिळवली.

यानंतर फिर्यादी यांच्या अॅक्सिस बँकेच्या खात्यावर १९ लाख ५३ हजार ७०१ रुपयांचे कर्ज करण्यात आल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद आहे. त्यानंतर १२ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजल्यापासून २५ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजेपर्यंतच्या कालावधीत फिर्यादी यांच्या संमतीशिवाय वेगवेगळ्या खात्यांमध्ये एकूण १२ लाख ७४ हजार ३३७ रुपये ऑनलाइन पद्धतीने वर्ग करण्यात आले.

आपल्या खात्यातून परस्पर मोठी रक्कम हस्तांतरित झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी मुरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून मुरूड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बळीराम केंद्रे करीत असून, ऑनलाइन व्यवहार तसेच संबंधित खात्यांची माहिती तपासण्याचे काम सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande