
जिल्ह्यात १ सप्टेंबरपासून हेल्मेट सक्ती
लातूर, 30 ऑगस्ट (हिं.स.)। जिल्ह्यात वाढत असलेले रस्ते अपघात आणि त्यातून होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी लातूर पोलीस दलाकडून हेल्मेट वापराबाबत कठोर भूमिका घेण्यात आली आहे. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांनी सुरुवात स्वतःपासून करावी, या भूमिकेतून आतापर्यंत विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या ५८ पोलीस अधिकारी व अंमलदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या कारवाईची नोंद संबंधितांच्या सेवा पुस्तिकेतही करण्यात येणार आहे.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर वाहतूक शाखेला स्पष्ट निर्देश दिले आहेत की, विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई करताना सुरुवात पोलीस अधीक्षक कार्यालयापासूनच झाली पाहिजे. पोलीस अधिकारी असो अथवा अंमलदार, विनाहेल्मेट दुचाकीवर येणाऱ्या कोणालाही नियमातून सूट दिली जाऊ नये, असे आदेश देण्यात आले आहेत.
पोलीस दलासाठी नियम अधिक गांभीर्याने
लातूर जिल्ह्यातील सर्व २३ पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना विनाहेल्मेट दुचाकीवर पोलीस ठाण्यात येणाऱ्या अधिकारी व अंमलदारांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित कारवाईची नोंद सेवा पुस्तिकेत घेण्याचेही आदेश आहेत.
“कायद्याची अंमलबजावणी करणारे आपण आहोत. त्यामुळे कायद्याचे पालन करण्याची सुरुवात स्वतःपासूनच झाली पाहिजे,” अशी भूमिका पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी घेतली आहे. त्यामुळे हेल्मेट सक्तीच्या अंमलबजावणीत लातूर पोलीस दल स्वतः उदाहरण निर्माण करत असल्याचे दिसून येत आहे.
१ सप्टेंबरपासून हेल्मेट सक्ती
लातूर जिल्ह्यात १ सप्टेंबर २०२६ पासून हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्यासाठी टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येत आहे. दुचाकी चालविताना हेल्मेट परिधान करणे ही केवळ वाहतूक नियमांची पूर्तता नसून स्वतःच्या जीविताच्या सुरक्षेसाठी आवश्यक बाब आहे. त्यामुळे १ सप्टेंबरपासून प्रत्येक दुचाकीस्वाराने स्वयंस्फूर्तीने हेल्मेट वापरून सुरक्षित वाहतुकीच्या संस्कृतीला हातभार लावावा, असे आवाहन लातूर पोलीस दलाकडून करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis