पोलिस पाटलांनी निडरपणे, पारदर्शकपणे काम करावे, लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांच्या पाठीशी - आ. प्रकाश सोळंके
बीड, 30 ऑगस्ट (हिं.स.)। माजलगाव उपविभाग पोलिस पाटील कार्यशाळा व मेळाव्याच्या प्रसंगी आमदार प्रकाश सोळंके यांनी उपस्थित राहून, अनेक वर्षांपासून रखडलेली पोलिस पाटील भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्या गुणवत्तेच्या बळावर पोलिस पाटील म्हणून पात्र ठ
प्रकाश सोळंके


बीड, 30 ऑगस्ट (हिं.स.)।

माजलगाव उपविभाग पोलिस पाटील कार्यशाळा व मेळाव्याच्या प्रसंगी आमदार प्रकाश सोळंके यांनी उपस्थित राहून, अनेक वर्षांपासून रखडलेली पोलिस पाटील भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्या गुणवत्तेच्या बळावर पोलिस पाटील म्हणून पात्र ठरलेल्या सर्व नवनियुक्त पोलिस पाटलांचे अभिनंदन केले.

पोलिस पाटील पदाची निवड प्रक्रिया ही कोणत्याही वशिल्याला अथवा हस्तक्षेपाला थारा न देता पारदर्शक पद्धतीने पार पडली आहे. ज्या पारदर्शक प्रक्रियेतून आपण या पदावर विराजमान झाला आहात, त्याच पारदर्शकतेची आणि निःपक्षपातीपणाची भूमिका आपल्या कार्यातही दिसली पाहिजे. गावातील कायदा व सुव्यवस्था, सामाजिक सलोखा आणि प्रशासनाला सहकार्य या जबाबदाऱ्या पार पाडताना पोलिस पाटलांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता निडरपणे आणि निष्पक्षपणे काम करावे. लोकप्रतिनिधी या नात्याने अशा प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पोलिस पाटलांच्या पाठीशी मी सदैव ठामपणे उभा राहीन असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला

या मेळाव्याच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलिस पाटील संघटनेच्या वतीने माझ्याकडे मांडण्यात आलेल्या विविध मागण्यांचा शासनस्तरावर पाठपुरावा करून त्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी निश्चितपणे प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पोलिस पाटलांसाठी स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध करून देणे अपेक्षित असतानाही अनेक ठिकाणी त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत संबंधित प्रशासनाने आवश्यक कार्यवाही करून पोलिस पाटलांना त्यांच्या कामासाठी योग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा स्पष्ट सूचना यावेळी केल्या.

तसेच माजलगाव उपविभागासाठी माजलगाव शहरात स्वतंत्र पोलिस पाटील भवन उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासह आवश्यक इमारत उभी करून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असा शब्दही यावेळी आमदार प्रकाश सोळंके यांनी पोलिस पाटील बांधवांना दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande