
परभणी, 30 ऑगस्ट (हिं.स.)।
: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत परभणीत आज रविवार रोजी आयोजित केलेल्या शेतकरी व युवक संवाद मेळावास्थान परिसरातून दुपारी स्थानिक पोलिस यंत्रणेने निदर्शने करणार्या सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
मराठा संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी सकाळी अंतरवाली सराटी येथून माध्यमांशी बोलतांना आपण मराठा समाजाच्या आरक्षणाच्या एकूण प्रश्नावर आपण उपोषण करीत असतांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परभणीत मेळावा घ्यावा हे उचित नाही, असे नमूद करीत खासदार संजय जाधव यांनी तो मेळावा रद्द करावा, असे नमूद केले होते. परंतु, खासदार जाधव यांनी तो मेळावा ऐनवेळ रद्द करणे उचित वाटत नाही, असे नमूद करीत मेळावा रद्द होणार नाही, असे म्हटले. या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाच्या बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात रविवारी दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने सुरु केली. त्यामुळे थोडासा तणाव निर्माण झाला. या कार्यकर्त्यांनी मेळावा रद्द झाला पाहिजे, एक मराठा लाख मराठा या आशयाच्या घोषणा दिल्या. स्थानिक पोलिस यंत्रणेने या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis