
महाबळेश्वरमध्ये विक्रमी पाऊस
मुंबई, 31 ऑगस्ट (हिं.स.)। महाराष्ट्रात यंदाच्या पावसाळ्यात हवामानाचा विरोधाभास पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक भागांत पावसाने दडी मारली असून ऐन पावसाळ्यात काही ठिकाणी उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. निम्म्याहून अधिक महाराष्ट्र अद्याप दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाअभावी खरीप पिकांवर मोठे संकट ओढवले आहे. शेतकरी आभाळाकडे डोळे लावून पावसाची प्रतीक्षा करत आहेत.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता असली तरी सर्वदूर जोरदार पाऊस होण्याची चिन्हे कमी आहेत. पश्चिम महाराष्ट्रात हलक्या पावसाचा अंदाज असून काही भागांत उष्ण, दमट आणि तुलनेने कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता असून हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात सध्या विशेष पावसाचा इशारा नसून काही भागांत कोरडे आणि बदलते हवामान राहण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातही उकाडा कायम राहण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये मात्र पावसाने अक्षरशः कहर केला आहे. महाबळेश्वरमध्ये यंदा तब्बल सहा हजार मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून एका दिवसात ५१३ मिलिमीटर पावसाचा विक्रमी पाऊस पडला आहे. मुसळधार पाऊस, धुके आणि ओसंडून वाहणारे धबधबे यामुळे निसर्गसौंदर्य खुलले असले तरी रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.
बुलढाणा जिल्ह्यात मात्र गेल्या महिनाभरापासून पावसाने ओढ दिल्याने सोयाबीन आणि कापूस पिके सुकण्याची भीती आहे. जिल्ह्यात चार लाख ६० हजार हेक्टरवर सोयाबीन, तर एक लाख पाच हजार हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली आहे. पुढील आठवडाभरात पाऊस न झाल्यास खरीप पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत.
लातूरमधील तांदुळजा परिसरात पावसाअभावी सोयाबीनवर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. सुमारे २५ टक्के क्षेत्र बाधित झाल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे. दुसरीकडे, रेणापूर तालुक्यात कोथिंबिरीला बाजारात अत्यल्प भाव मिळत असल्याने शेतकरी राजाभाऊ मोठेगावकर यांनी एकरभर पिकावर नांगर फिरवला. उत्पादनासाठी मोठा खर्च करूनही अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक संकट अधिकच गडद झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule