हिंदू जागृत झाले तर जग जागृत होते - मोहन भागवत
नवी दिल्ली , 31 ऑगस्ट (हिं.स.)। जगात कुठेही भारताकडे मदतीसाठी मागणी करण्यात आली, तर भारताने कधीही नकार दिलेला नाही. तसेच मदत मागितली नसतानाही भारताने अनेकदा मदतीचा हात पुढे केला आहे. हीच आपली परंपरा आहे, हाच भारताचा डीएनए आहे. म्हणूनच तुम्ही ही म्
हिंदू जागृत झाले तर जग जागृत होते- मोहन भागवत


नवी दिल्ली , 31 ऑगस्ट (हिं.स.)। जगात कुठेही भारताकडे मदतीसाठी मागणी करण्यात आली, तर भारताने कधीही नकार दिलेला नाही. तसेच मदत मागितली नसतानाही भारताने अनेकदा मदतीचा हात पुढे केला आहे. हीच आपली परंपरा आहे, हाच भारताचा डीएनए आहे. म्हणूनच तुम्ही ही म्हण ऐकली असेल की, हिंदू जागृत झाले तर जग जागृत होते असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. कॅनडातील टोरंटो येथे आयोजित ‘हिंदू विश्व बंधु-मैत्रीसह जगाला आपलेसे करा’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी डॉ भागवत म्हणाले की, हिंदू सजीव आणि निर्जीव अशा दोन्ही गोष्टींना आपले मानतात. विविधतेत एकता पाहण्याची शिकवण त्यांना देण्यात आली आहे. त्यामुळे भारतात विविधता कधीही एकतेसाठी अडथळा ठरत नाही. आपली परंपरा आपल्याला केवळ विविधतेत एकता आहे असे शिकवत नाही, तर विविधता हीदेखील एकतेचेच एक रूप आहे, अशी शिकवण देते. जे लोक खुले विचारांचे आणि ज्ञानी आहेत, ते ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्पना स्वीकारतात. म्हणजेच संपूर्ण पृथ्वी हे एक कुटुंब आहे, असा विश्वास. भौतिक जगात माणसे शरीरयष्टी, आकार आणि रंगरूपाच्या बाबतीत वेगवेगळी असू शकतात; मात्र खऱ्या अर्थाने आपण सर्व एकच आहोत. त्यामुळे इतरांची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे. आम्ही असे ज्ञान प्राप्त केले आहे, जे आपल्याला कायमस्वरूपी आनंद आणि समाधान देत असल्याचे त्यांनी सांगितले.

‘हिंदू’ म्हणताना हा शब्द कोणत्याही विशिष्ट भाषा, पूजापद्धती किंवा जीवनशैलीच्या आधारे परिभाषित करता येत नाही. या सर्व गोष्टी त्यात समाविष्ट आहेत. या मानवजातीतील विविधता आहेत. हिंदू सर्वांचा आदर करतात आणि त्यांना स्वीकारतात. जगात कुठेही कोणावर अत्याचार झाला, तर त्याला केवळ भारतातच आश्रय मिळाला. अनेक लोक बाहेरून आक्रमक म्हणून भारतात आले, मात्र आजही ते आपली वैशिष्ट्ये जपत येथे प्रगती करत आहेत. आता ते भारतीय नागरिक आहेत. येथे मुस्लिम, ख्रिश्चन आणि ज्यू समुदायही अल्पसंख्याक म्हणून आहेत. अनेक लोक आश्रय घेण्यासाठी भारतात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. यापूर्वी शनिवारी न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधील इन्फोसिस थिएटरमध्ये आयोजित एका भव्य कार्यक्रमात संघप्रमुख मोहन भागवत यांनी सांगितले की, विविधतेतील एकता भारताच्या डीएनएमध्ये आहे. तिचा उत्सव साजरा केला पाहिजे, तिचा आदर केला पाहिजे आणि तिला स्वीकारले पाहिजे. ते म्हणाले, “जेव्हा आपण अमेरिका किंवा युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका असे म्हणतो, तेव्हा एका शब्दाची नेहमी चर्चा होते आणि तो म्हणजे बहुलतावाद. आणि जेव्हा आपण भारत म्हणतो, तेव्हा आणखी एका वाक्यांशाची चर्चा होते—विविधतेत एकता.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande