
आमदार बच्चू कडू यांच्या मध्यस्थीनंतर एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
अमरावती, 31 ऑगस्ट (हिं.स.) | अमरावती मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मेंढपाळ बांधवांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आणि वन चराई हक्काच्या मुद्द्यावर सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन अखेर पाचव्या दिवशी मागे घेण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते तथा धनगर समाजाचे नेते अर्जुन महानर हे गेल्या ५ दिवसांपासून या मागण्यांसाठी उपोषणाला बसले होते.
सोमवारी आमदार बच्चू कडू यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर बच्चू कडू यांनी फोनवरून थेट एकनाथ शिंदे यांच्याशी उपोषणकर्त्यांचे बोलणे करून दिले. या चर्चेदरम्यान शिंदे यांनी मेंढपाळांच्या समस्यांवर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले, तसेच केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांच्यासोबतही तातडीने बैठक घडवून आणण्याचे आश्वासन दिले. शासनाकडून ठोस आश्वासन मिळाल्यानंतर अर्जुन महानर यांनी बच्चू कडू यांच्या उपस्थितीत आपले उपोषण मागे घेण्याची घोषणा केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी