आसाममध्ये पूरामुळे अजूनही सात जिल्ह्यांतील १.२८ लाख लोकसंख्या प्रभावित; मृतांचा आकडा ८७ वर
गुवाहाटी, 04 ऑगस्ट (हिं.स.)। आसाममध्ये पूरामुळे अजूनही सात जिल्हे गंभीररीत्या प्रभावित आहेत. प्रभावित जिल्ह्यांमध्ये चराईदेव, शिवसागर, धेमाजी, गोलाघाट, बिश्वनाथ, जोरहाट आणि लखीमपूर यांचा समावेश आहे. पूरामुळे या जिल्ह्यांतील २४ महसूल मंडळांतील एकूण
Floods Assam affect people across seven districts death toll rises 87


गुवाहाटी, 04 ऑगस्ट (हिं.स.)। आसाममध्ये पूरामुळे अजूनही सात जिल्हे गंभीररीत्या प्रभावित आहेत. प्रभावित जिल्ह्यांमध्ये चराईदेव, शिवसागर, धेमाजी, गोलाघाट, बिश्वनाथ, जोरहाट आणि लखीमपूर यांचा समावेश आहे. पूरामुळे या जिल्ह्यांतील २४ महसूल मंडळांतील एकूण ३८० गावांमधील १ लाख २८ हजार ०७१ लोकसंख्या प्रभावित झाली असून १४ हजार २३०.१४८ हेक्टर शेतीक्षेत्र पाण्याखाली गेले आहे.

पूराचा सर्वाधिक तडाखा मुख्यतः अप्पर आसाममधील शिवसागर, चराईदेव, जोरहाट आणि गोलाघाट या चार जिल्ह्यांना बसला आहे. यामध्ये शिवसागर जिल्ह्याची परिस्थिती सर्वाधिक गंभीर आहे. पाणी आणि चिखल अजूनही लोकांच्या घरांमध्ये तसेच रस्त्यांवर साचलेला आहे. सरकारसोबतच स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक नागरिकही प्रभावित भागात पोहोचून मदतकार्य करत आहेत. मुख्यमंत्री डॉ. हिमंत बिस्व सरमा हे २ ऑगस्टपासून अप्पर आसाममध्ये तळ ठोकून असून मदतकार्य अधिक वेगाने करण्यासाठी सर्व बाबींवर लक्ष ठेवून आहेत.

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या ३ ऑगस्टच्या आकडेवारीनुसार, धनसिरी नदी (नुमलीगढ) परिसरात अजूनही धोक्याच्या पातळीपेक्षा वर वाहत आहे. दरम्यान, सोमवारी शिवसागर जिल्ह्यातून आणखी दोन जणांचे मृतदेह सापडले. त्यामुळे राज्यातील पूरामुळे मृतांचा एकूण आकडा ८७ वर पोहोचला आहे. सरकारने पूरग्रस्तांसाठी ३८ मदत शिबिरे आणि १७ मदत वितरण केंद्रांसह एकूण ५५ केंद्रे कार्यरत ठेवली आहेत. मदत शिबिरांमध्ये ११,०६६ लोकांनी आश्रय घेतला असून, मदत वितरण केंद्रांवर १८४ शिबिराबाहेरील नागरिकांना मदत दिली जात आहे.

पूरग्रस्त भागांतील मदत व बचाव कार्यात एसडीआरएफ, सेना/अर्धसैनिक दल, एनडीआरएफ, डीडीआरएफ, हवाई दल, पोलीस, अग्निशमन व आपत्कालीन सेवा (एफ अँड ईएस), सर्कल कार्यालय/स्थानिक प्रशासन, नागरी संरक्षण/प्रशिक्षित स्वयंसेवक आणि अग्निशमन विभाग सहभागी आहेत. दरम्यान, पूरग्रस्त भागांमध्ये शनिवारी राज्य सरकारने एकूण ७६ वैद्यकीय पथके तैनात केली. तसेच २३ नौकाही मदतकार्यात कार्यरत होत्या. पूरामुळे मोठ्या प्रमाणावर रस्ते, पूल आणि इतर पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे. त्यांच्या दुरुस्तीसाठी सरकार सातत्याने आढावा बैठका घेऊन परिस्थितीचा आढावा घेत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande