
- सुमारे 4 अल्पवयीन मुलांसह 9 आरोपींना अटक- बेकायदेशीर शस्त्रे, काडतुसे आणि पेट्रोल बॉम्ब जप्त
चंदीगड, ४ ऑगस्ट (हिं.स.) पंजाबमधील अमृतसर पोलिसांनी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या पाठिंब्याने कार्यरत असलेल्या दोन दहशतवादी गटांचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत 4 अल्पवयीन मुलांसह एकूण 9आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून तीन बेकायदेशीर पिस्तूल, 9 जिवंत काडतुसे आणि पेट्रोलच्या चार बाटल्या जप्त करण्यात आल्या.
पंजाब पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी सांगितले की, अटक केलेले आरोपी परदेशातील आयएसआयच्या सूत्रधारांच्या संपर्कात होते आणि त्यांच्या सूचनेनुसार काम करत होते. या तरुणांना दहशतवादी कारवायांसाठी तयार केले जात होते. त्यांना सुरक्षा यंत्रणांची टेहळणी करणे, बेकायदेशीर शस्त्रे मिळवणे आणि पंजाबमधील शांतता व कायदा-सुव्यवस्था बिघडवणे यांसारखी कामे सोपवण्यात आली होती. पोलिसांनी केलेल्या तपासणीत असे आढळून आले की, आरोपींनी रेल्वे रुळांजवळ पाळत ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. या कॅमेऱ्यांमधून रेकॉर्ड केलेले फुटेज संवेदनशील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी परदेशी आयएसआयच्या सूत्रधारांना पाठवले जात असल्याचा आरोप आहे.
सुमारे महिनाभरापूर्वी, अमृतसर-दिल्ली रेल्वे मार्गावरील एका ओव्हरहेड विद्युत खांबावर एक सीसीटीव्ही कॅमेरा आढळून आला होता. कॅमेऱ्याला वीजपुरवठा करण्यासाठी एक सोलर पॅनलदेखील बसवण्यात आले होते. तपासादरम्यान, पोलिसांना कॅमेऱ्याच्या सिम कार्ड स्लॉटमध्ये गुरदेवच्या नावावर नोंदणीकृत असलेले एक सिम कार्ड आढळले. याच्या आधारे पोलिसांनी गुरदेवला अटक केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे