
'गुंगी गुडिया'टीकेवर दिली पहिली प्रतिक्रिया
मुंबई, 04 ऑगस्ट (हिं.स.) : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसकडून करण्यात आलेल्या 'गुंगी गुडिया' या टिप्पणीवरून राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. याविषयावर प्रतिक्रिया देताना सुनेत्रा पवार यांनी “मी वेळ आल्यानंतर उत्तर देईन” असे सूचक विधान केले.
काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवर सुनेत्रा पवार यांचा उल्लेख 'गुंगी गुडिया' असा करण्यात आला. यावरून काँग्रेस आणि विरोधांमध्ये तीव्र शाब्दीक खडाजंगी दिसून आली. राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसच्या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवला आहे. पक्षाचे नेते सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेस कार्यालयाबाहेर आंदोलन करत घोषणाबाजी केली. संबंधित टिप्पणी महिलांचा आणि उपमुख्यमंत्रिपदाचा अवमान करणारी असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काँग्रेसवर जोरदार टीका केली. चर्चेत राहण्यासाठी काँग्रेस अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण करत आहे. लोकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने अशा प्रकारच्या वक्तव्यांचा आधार घेतला जात आहे. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत अशा प्रकारचे राजकारण दुर्दैवी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
दुसरीकडे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्षाच्या भूमिकेचे समर्थन केले. त्यांनी सांगितले की, या टीकेकडे राष्ट्रवादीने सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज आहे. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही एकेकाळी 'गुंगी गुडिया' अशी उपमा देण्यात आली होती. मात्र त्यांनी आपल्या कर्तृत्वाने ती प्रतिमा बदलली. सुनेत्रा पवार यांनीही आपल्या कामगिरीतून स्वतःला सिद्ध करावे असे सांगितले. तर याच विषयावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी संयमित भूमिका मांडतांना काँग्रेस पक्षाला घरचा अहेर दिलाय. राजकारणात महिलांचे प्रतिनिधित्व आधीच कमी आहे. अशा परिस्थितीत सक्रिय महिलांविषयी अवमानकारक शब्दप्रयोग टाळणे आवश्यक आहे. महिलांना प्रोत्साहन देणारी आणि सन्मान राखणारी राजकीय भाषा वापरली गेली पाहिजे असे चव्हाण यांनी सांगितले.
या वादामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आणखी तापले असून, सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी वेळ आल्यावर उत्तर देईन असे म्हटल्याने त्यांच्या पुढील भूमिकेकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.----------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी