लाल समुद्रात भारतीय मालवाहू जहाजावर हल्ला; 14 भारतीय खलाशी सुरक्षित, भारताकडून तीव्र निषेध
नवी दिल्ली , 05 ऑगस्ट (हिं.स.)। लाल समुद्रात पुन्हा एकदा सागरी सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे. यमनच्या सागरी हद्दीजवळ भारतीय ध्वज असलेल्या एमएसव्ही फैजे नूरे ओलिया या मालवाहू जहाजावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर जहाज समुद्रात बुडाले. मात्र, दिलास
लाल समुद्रात भारतीय मालवाहू जहाजावर हल्ला; 14 भारतीय  खलाशी सुरक्षित, भारताकडून तीव्र निषेध


नवी दिल्ली , 05 ऑगस्ट (हिं.स.)। लाल समुद्रात पुन्हा एकदा सागरी सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे. यमनच्या सागरी हद्दीजवळ भारतीय ध्वज असलेल्या एमएसव्ही फैजे नूरे ओलिया या मालवाहू जहाजावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर जहाज समुद्रात बुडाले. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे जहाजावरील सर्व 14 कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका करण्यात आली. या घटनेनंतर भारत सरकारने हल्ल्याचा तीव्र निषेध करत भारतीय खलाशांच्या सुरक्षेसाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.

केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितले की, यमनच्या सागरी हद्दीजवळ भारतीय ध्वज असलेल्या मेकनाइज्ड सेलिंग व्हेसल (एमएसव्ही) फैजे नूरे ओलिया या जहाजाला एका प्रोजेक्टाइलने लक्ष्य केले. या हल्ल्यामुळे जहाज उलटले आणि त्यानंतर समुद्रात बुडाले. मिळालेल्या माहितीनुसार, नॅशनल रेझिस्टन्स फोर्स (NRF) ने दावा केला आहे की, स्फोटकांनी भरलेल्या बोटीच्या साहाय्याने जहाजावर हल्ला करण्यात आला. ही घटना हूती बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या होदेदाह बंदरापासून सुमारे 13 सागरी मैल दक्षिणेला घडली. मात्र, या दाव्यावर हूती बंडखोरांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

सोनोवाल यांनी सांगितले की, जहाजावर एकूण 14 कर्मचारी होते. त्यामध्ये 13 भारतीय आणि एक यमनचा नागरिक होता. येमेनच्या तटरक्षक दलाने सर्वांची सुखरूप सुटका करून त्यांना मोखा बंदरात सुरक्षित आणले. सुटका झाल्यानंतर सर्वांना आवश्यक वैद्यकीय उपचार देण्यात आले असून, कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

सोनोवाल यांनी सांगितले की, भारतीय नागरिकांची सुरक्षा ही केंद्र सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. त्यांनी महासंचालक, सागरी प्रशासन (DGMA) यांना संबंधित सर्व यंत्रणांशी समन्वय साधून या परिसरातील भारतीय खलाशांच्या सुरक्षेची खात्री करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, बचाव करण्यात आलेल्या चालक दलाला आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्यासही सांगितले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्याचा तीव्र निषेध करत, या भागातील व्यापारी जहाजांवर होणारे हल्ले तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे. मंत्रालयाने जहाजावरील सर्व 13 भारतीय नागरिक सुरक्षित असल्याची पुष्टी केली आहे.तसेच, रियाधस्थित भारतीय दूतावास संपूर्ण घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून असून, यमनमधील अधिकाऱ्यांशी सातत्याने समन्वय साधत चालक दलाची सुरक्षा आणि आवश्यक मदत सुनिश्चित करत असल्याचेही मंत्रालयाने स्पष्ट केले.

भारतीय ध्वज असलेल्या जहाजावरील हा हल्ला अशा वेळी झाला आहे, जेव्हा लाल समुद्र आणि यमनलगतच्या सागरी मार्गांच्या सुरक्षेबाबत आधीपासूनच चिंता व्यक्त केली जात आहे. या ताज्या घटनेनंतर भारताने स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, व्यापारी जहाजांवर होणारे हल्ले तातडीने थांबवले जावेत आणि आंतरराष्ट्रीय सागरी मार्गांची सुरक्षा सुनिश्चित करणे अत्यावश्यक आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande