पंजाब : बीएसएफने पाडले 3 पाकिस्तानी ड्रोन, शस्त्रसाठा जप्त
तरणतारण,05 ऑगस्ट (हिं.स.) : पाकिस्तानहून भारतीय हद्दीत घुसखोरी करणारे 3 ड्रोन सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) कारवाई करून पाडले. त्यानंतर राबविण्यात आलेल्या शोध मोहिमेत मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका तस्कराला
पंजाबच्या तरणतारणमध्ये बीएसएफने ड्रोन पाडून जप्त केलेला शस्त्रसाठा


तरणतारण,05 ऑगस्ट (हिं.स.) : पाकिस्तानहून भारतीय हद्दीत घुसखोरी करणारे 3 ड्रोन सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) कारवाई करून पाडले. त्यानंतर राबविण्यात आलेल्या शोध मोहिमेत मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका तस्कराला अटक केली असून स्थानिक खालडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खालरा सेक्टरमध्ये तैनात असलेल्या बीएसएफच्या 142व्या बटालियनच्या जवानांना रात्री बीओपी मंगली पोस्ट परिसरात ड्रोनच्या हालचाली जाणवल्या. पाकिस्तानच्या बाजूने एकाच दिशेने तीन ड्रोन भारतीय हद्दीत येत असल्याचे जवानांच्या लक्षात आले. त्यानंतर बीएसएफ जवानांनी ड्रोनवर गोळीबार केला, ज्यामुळे हे ड्रोन गायब झाले. घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम राबविण्यात आली. या कारवाईदरम्यान एका तस्कराला पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपीचे नाव मनजित सिंग असून तो तरणतारण जिल्ह्यातील वान गावातील रहिवासी आहे. याबाबत तरणतारणचे पोलिस अधीक्षक सुरिंदर लांबा यांनी सांगितले की, शोध मोहिमेत 7 विदेशी बनावटीच्या पिस्तुलांसह एक ग्राफर सिक्युरिटी गन, 89 काडतुसे आणि मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहेत. हा शस्त्रसाठा पाकिस्तानातील तस्करांच्या संपर्कातून मागवण्यात आला होता. या प्रकरणी खालरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. तीन ड्रोनच्या माध्यमातून तस्करी करून आणलेला शस्त्रसाठा जप्त करणे ही बीएसएफची मोठी कामगिरी असल्याचे एसएसपी सुरिंदर लांबा यांनी म्हटले आहे.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande