
नवी दिल्ली, ५ ऑगस्ट (हिं.स.) : जम्मू आणि काश्मीर तसेच लडाखमधून कलम ३७० रद्द केल्याला ७ वर्षे पूर्ण झाली आहेत. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, सात वर्षांपूर्वी कलम ३७० आणि ३५(अ) इतिहासजमा झाले. या घटनेने जम्मू आणि काश्मीर तसेच लडाखच्या विकासात एका निर्णायक नव्या अध्यायाची सुरुवात झाली. यामुळे जम्मू आणि काश्मीर तसेच लडाखच्या लोकांच्या जीवनात मोठे बदल घडून आले आहेत. यावर्षी ५ ऑगस्ट हा दिवस अधिक महत्त्वाचा आहे, कारण देश डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांची १२५ वी जयंती साजरी करत आहे.
५ ऑगस्ट रोजी दोन्ही केंद्रशासित प्रदेशांमध्ये झालेल्या बदलांचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले की, पायाभूत सुविधांचा विस्तार झाला आहे. शिक्षण, आरोग्यसेवा, उद्योजकता आणि क्रीडा यांसारख्या क्षेत्रांमध्ये संधी वाढल्या आहेत. महिला असोत किंवा वंचित समुदाय, जे लोक अनेक दशकांपासून त्यांच्या मूलभूत घटनात्मक हक्कांपासून वंचित होते, ते भारतीय संविधानाच्या पूर्ण अंमलबजावणीमुळे सक्षम झाले आहेत.
डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे स्मरण करताना ते म्हणाले की, राष्ट्रीय एकतेसाठीचे त्यांचे आयुष्यभराचे समर्पण पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत आहे. त्यांनी अनेक दशकांपूर्वी याची कल्पना केली होती आणि ५ ऑगस्ट २०१९ रोजी ती ऐतिहासिकदृष्ट्या साकार झाली.
पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला की, सरकार जम्मू आणि काश्मीर तसेच लडाखच्या प्रगतीसाठी कटिबद्ध आहे. प्रत्येक नागरिकाला मोठी स्वप्ने पाहण्याची, ती साकार करण्याची आणि विकसित भारताच्या उभारणीत योगदान देण्याची संधी मिळावी, अशी आमची इच्छा आहे.
गृह मंत्रालयाने एका निवेदनामध्ये म्हटले आहे की, कलम ३७० हटवल्यामुळे जम्मू आणि काश्मीरमध्ये शांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. कलम ३७० रद्द झाल्यापासून काश्मीरमध्ये बरेच काही बदलले आहे. दगडफेक ही आता भूतकाळातील गोष्ट झाली आहे. कलम ३७० रद्द झाल्यानंतर सात वर्षांनी काश्मीरने ऐतिहासिक टप्पे गाठले आहेत.
मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, २०२२ पासून दगडफेकीच्या घटना जवळपास शून्य झाल्या आहेत, २०२३ पासून एकही बंद झालेला नाही, २०२४ मध्ये विक्रमी २३ कोटी पर्यटकांचे आगमन झाले, १८ जीआय-टॅग केलेल्या हस्तकला वस्तू, चिनाब पूल, सोनमर्ग बोगदा, पहिले वंदे भारत मिशन, पहिली इलेक्ट्रिक ट्रेन आणि या काळात काश्मीरसाठी इतर अनेक ऐतिहासिक उपलब्धी झाल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे