झारखंड : जेपीएससी परीक्षेतील अनियमिततेविरोधात रांचीतील विद्यार्थ्यांचे आंदोलन बाराव्या दिवशीही सुरू
रांची, 05 ऑगस्ट (हिं.स.)। झारखंडमधील स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन बुधवारी बाराव्या दिवशीही सुरू होते. रांची येथील जयपाल सिंह मुंडा स्टेडियममध्ये विद्यार्थी आपल्या मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन करत आहेत. दरम्यान, सा
Ranchi students protest against JPSC exam irregularities continues twelfth day


रांची, 05 ऑगस्ट (हिं.स.)। झारखंडमधील स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन बुधवारी बाराव्या दिवशीही सुरू होते. रांची येथील जयपाल सिंह मुंडा स्टेडियममध्ये विद्यार्थी आपल्या मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन करत आहेत. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी उपोषणावर बसलेले विद्यार्थी नेते देवेंद्र नाथ महातो आणि ब्रह्मानंद यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी दोन्ही विद्यार्थ्यांना पाणी देऊन उपोषण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, विद्यार्थ्यांनी आपले उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

देवेंद्र नाथ महातो आणि ब्रह्मानंद यांनी 2 ऑगस्टपासून अन्न आणि पाणी त्याग करून उपोषण सुरू केले होते. त्यानंतर त्यांनी “आमचे उपोषण सुरूच राहील,” अशी घोषणा केली. मंगळवारी ब्रह्मानंद यांनी पावसात उघड्यावर बसून उपोषण केले होते. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. विद्यार्थ्यांनी मागण्या मान्य न झाल्यास 7 ऑगस्ट रोजी झारखंड विधानसभेला घेराव घालण्याचा इशारा दिला आहे.

झारखंड लोकसेवा आयोगाच्या (जेपीएससी) 14 व्या संयुक्त नागरी सेवा पूर्व परीक्षेच्या निकालानंतर हे आंदोलन सुरू झाले. 2 जुलै रोजी जाहीर झालेल्या निकालात मुख्य परीक्षेसाठी 2 हजार 204 उमेदवारांची निवड करण्यात आली होती. मात्र, निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक उमेदवारांनी परीक्षेच्या प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप केला. कट-ऑफ जाहीर करण्यात आला नसल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला.

याशिवाय, एका उमेदवाराची कथित ओएमआर शीट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या उमेदवाराने केवळ 48 प्रश्न सोडवले असतानाही त्याची मुख्य परीक्षेसाठी निवड झाल्याचा आरोप करण्यात आला. तसेच निकालाच्या कागदपत्रांवर आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या नसल्याचा मुद्दाही विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. वाढत्या विरोधानंतर जेपीएससीने मुख्य परीक्षा रद्द केली.

विद्यार्थ्यांची मागणी आहे की, केवळ 14 व्या जेपीएससी परीक्षेचीच नव्हे तर संपूर्ण भरती प्रक्रियेची सखोल चौकशी करण्यात यावी. या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यांच्यामार्फत करण्यात यावा, अशी त्यांची मागणी आहे. तसेच प्रकरणासाठी जलदगती न्यायालय स्थापन करून वेळेत निर्णय देण्यात यावा, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

विद्यार्थ्यांनी टीडीपीएल (टीएसआर डेटा प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड) या कंपनीमार्फत घेण्यात आलेल्या सर्व परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. कंपनीला काळ्या यादीत टाकून भविष्यातील परीक्षा विश्वासार्ह संस्थेमार्फत घेण्यात याव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे. याशिवाय भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या जेपीएससी आणि जेएसएससीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्या जागी प्रामाणिक अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande