
कोल्हापूर, 06 ऑगस्ट (हिं.स.)। भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील एक धगधगत पर्व रुपेरी पडद्यावर साकारण्यासाठी सज्ज झालं आहे. ‘पत्री सरकार १९४२’ या आगामी मराठी चित्रपटाचे टिझर क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीदिनी सांगली जिल्ह्यातील विटा येथील क्रांतीसिंह नाना पाटील लोक विद्यापीठ येथे क्रांतीसिंह नाना पाटील यांचे नातू ॲड. सुभाष पाटील (बापू), नात, सुशिलाताई पाटील आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांच्या उपस्थितीत प्रदर्शित करण्यात आला.
क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सातारा प्रांतात १९४२ साली प्रतिसरकार स्थापन करून ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडलं. नाना पाटलांच्या प्रेरणेने क्रांती अग्रणी जी डी लाड, क्रांतिवीर नागनाथ नायकवडी यांच्यासारख्या हजारो देशभक्तांनी दरोडेखोरी, जुलुमी,सावकारशाही, इंग्रज सत्ता यांच्याशी यशस्वी लढा देऊन पत्री सरकारची दहशत थेट लंडनच्या संसदेत पोहोचवली. प्रतिसरकारच्या अशा अनेक अज्ञात क्रांतीवीरांची धगधगती शौर्यगाथा घेऊन ‘पत्री सरकार १९४२’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे.
या टिझर प्रदर्शनाच्या निमित्ताने बोलताना ॲड. सुभाष पाटील यांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांचेवर चित्रपट निघावा अशी सांगली, सातारा, कोल्हापूर येथील सर्वच जुन्या जाणत्या लोकांची इच्छा होती. काही प्रयत्नही झाले.
क्रांतीसिंह नाना पाटील किंवा पत्री सरकार चळवळ यावर चित्रपट बनवताना, लागेल ते सहकार्य करण्याची तयारी आणि इतिहासाची मोडतोड करून वास्तवापासून दूर जाणारी पटकथा असू नये अशी आमच्या कुटुंबातील सर्वाची धारणा होती. त्या प्रमाणे माहिती, संदर्भ यासाठी उपलब्ध पुस्तके जीवनचरित्र, तत्कालीन घटनांची स्थळे, प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या ऐकलेल्या जेष्ठ व्यक्तींच्या भेटी, आवश्यक परवाने याबाबत पूर्ण सहकार्य केले. याबाबत निर्मीता, दिग्दर्शक यांनीही पूर्ण दक्षता घेतल्याचे टिझरवरून दिसून येते. चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वासही त्यानी व्यक्त केला.
या कार्यक्रमास निर्माते विशाल गोविंद जाधव, दिग्दर्शक मनीष अनसुरकर,मुख्य कलाकार अनिल राबाडे कोल्हापूर, सिद्धार्थ बढी,शुभम गवई,अभिमन्यू पायल, बाबूराव पायल प्राचार्य - शिवाजीराव जाधव,विनायक जाधव सर ,राहूल गोविंद जाधव,अक्षय जाधव, सुरज जाधव,शिवाजी तुकाराम निकम आदि मान्यवर उपस्थित होते.
चित्रपटाच्या टिझर वरून हा सिनेमा केवळ मनोरंजन न करता इतिहासातील एका महत्त्वपूर्ण पर्वाची आठवण करून देणारा ठरणार असल्याचं चित्र दिसून येत आहे. ‘भागीरथी मोशन पिक्चर’ तर्फे ‘पत्री सरकार १९४२’ हा चित्रपट असून विशाल गोविंदराव जाधव यांनी चित्रपटाची निर्मिती लीलया पार पाडली आहे. तर चित्रपटाचे गीत, संगीत, लेखन, दिग्दर्शन याची धुरा मनीष अनसुरकर यांनी केलं आहे. सौरभ लता शिवकुमार यांनी पार्श्व संगीताची जबाबदारी उचलली असून विशाल जाधव, गोरख गुंजाळ, अनन्या नाईक, आनंद मेनन यांच्याआवाजात चित्रपटातील गाणी स्वरबद्ध केली आहेत.
चित्रपटाचे दिग्दर्शक मनीष अनसुरकर म्हणाले, “ब्रिटिशांच्या विरोधात पेटलेली क्रांती नेमकी कशी होती हे दाखवण्याचा प्रयत्न ‘पत्री सरकार १९४२’ या चित्रपटातून केला आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांचा प्रवास मोठ्या पडद्यावर या चित्रपटातून दाखवायचा होता. पण संपूर्ण टीमच्या मदतीने ते सहज शक्य झालं. महाराष्ट्राच्या मातीत पेटलेल्या स्वातंत्र्याच्या लढ्याची आणि क्रांतीकारकांच्या शौर्याची कथा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार असल्याने ‘पत्री सरकार १९४२’ या चित्रपटाकडे आता सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar