
मुंबई, 06 ऑगस्ट (हिं.स.) दिग्दर्शक अमित राय यांचा आगामी कौटुंबिक मनोरंजक चित्रपट 'ओह माय डॉग' याला देशभरातील १५ शहरांमध्ये आयोजित विशेष प्रदर्शनांदरम्यान प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम आणि सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या प्रतिसादाने हुरूप आल्यामुळे, निर्मात्यांनी अधिकृत प्रदर्शनाच्या एक दिवस आधी, म्हणजेच ६ ऑगस्ट रोजी देशभरात १४९ रुपयांच्या विशेष दरात 'पेड प्रिव्ह्यू शोज' (सशुल्क पूर्व-प्रदर्शन) आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा चित्रपट ७ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
कोलकाता, लखनौ, जयपूर, इंदूर, दिल्ली, पुणे, पाटणा, अहमदाबाद, गुवाहाटी, बेंगळुरू, हैदराबाद आणि मुंबई यांसारख्या शहरांमधील विशेष प्रदर्शनांनंतर, या चित्रपटाच्या भावपूर्ण आणि हृदयस्पर्शी कौटुंबिक कथानकाचे कौतुक करण्यात आले. दिग्दर्शक अमित राय यांनी सांगितले की, प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रेमामुळेच या उपक्रमाची प्रेरणा मिळाली. त्यांनी नमूद केले की, १४९ रुपयांच्या या प्रिव्ह्यू शोजमुळे अधिकृत प्रदर्शनापूर्वीच मोठ्या संख्येने प्रेक्षकांना हा चित्रपट पाहण्याची संधी मिळेल.
'ओह माय डॉग'चे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती अमित राय यांनी केली आहे. या चित्रपटाची निर्मिती राजेश भारद्वाज आणि सना वारसी यांनी 'बाबूलाल बायोस्कोप' आणि 'थिंकिंग हॅट्स एंटरटेनमेंट'च्या बॅनरखाली केली आहे. यात माही राय, पंकज त्रिपाठी, गीता अग्रवाल शर्मा, राजेश कुमार, पवन मल्होत्रा, सुलक्षणा बरुआ आणि विजय मिश्रा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. याव्यतिरिक्त, २५० हून अधिक कुत्र्यांचा (ज्यामध्ये ऑस्कर आणि ब्रुनो यांचाही समावेश आहे) सहभाग या चित्रपटाला एक वेगळीच शोभा देतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर