चिखलदरा ग्रामीण रुग्णालयात अवयवदान जनजागृती सप्ताहाचा प्रारंभ
नागरिकांना अवयवदानाचा संकल्प करण्याचे आवाहन अमरावती, ७ ऑगस्ट (हिं.स.) : राष्ट्रीय अवयव व ऊतक प्रत्यारोपण संस्था तसेच राज्य शासनाच्या निर्देशानुसार ३ ते १३ ऑगस्टदरम्यान साजऱ्या होत असलेल्या अवयवदान जनजागृती सप्ताहाचा प्रारंभ चिखलदरा येथील ग्रामीण र
जनजागृती सप्ताहातून मृत्यूनंतरही नवजीवनाचा संदेश


नागरिकांना अवयवदानाचा संकल्प करण्याचे आवाहन

अमरावती, ७ ऑगस्ट (हिं.स.) : राष्ट्रीय अवयव व ऊतक प्रत्यारोपण संस्था तसेच राज्य शासनाच्या निर्देशानुसार ३ ते १३ ऑगस्टदरम्यान साजऱ्या होत असलेल्या अवयवदान जनजागृती सप्ताहाचा प्रारंभ चिखलदरा येथील ग्रामीण रुग्णालयात उत्साहात करण्यात आला. समाजातील अवयवदानाबाबतचे गैरसमज दूर करून नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करणे आणि मृत्यूनंतरही इतरांना नवजीवन देण्याच्या कार्यासाठी प्रेरित करणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

सप्ताहाच्या प्रारंभी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अवयवदान जनजागृतीचे प्रतीक असलेले हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करून समाजाला अवयवदानाचा संदेश दिला. या उपक्रमात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

यानंतर ग्रामीण रुग्णालयाच्या पथकाने चिखलदरा पोलिस ठाणे आणि तहसील कार्यालयात विशेष जनजागृती अभियान राबविले. यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांना अवयवदानाचे सामाजिक महत्त्व, मेंदूमृत्यूनंतर होणारे अवयवदान, अवयवदानामुळे अनेक गरजू रुग्णांना मिळणारे नवजीवन तसेच समाजात अवयवदानाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याची गरज याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना अवयवदानाची प्रतिज्ञा देण्यात आली. तसेच इच्छुक नागरिकांनी नोटो (NOTTO) पोर्टलवर नोंदणी करून अवयवदाता म्हणून संकल्प करण्याचे आवाहन करण्यात आले. नोंदणीची प्रक्रिया आणि त्याचे महत्त्वही यावेळी समजावून सांगण्यात आले.

या उपक्रमाचे नेतृत्व वैद्यकीय अधीक्षक डॉ. गवई यांनी केले. यावेळी डॉ. आदित्य महांकर, डॉ. नितीन चव्हाण यांच्यासह ग्रामीण रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्य कर्मचारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande