
अकोला, 07 ऑगस्ट, (हिं.स.)। अकोला शहरात पुन्हा एकदा चोरट्यांनी धाडसी चोरी करत पोलिसांना आव्हान दिले आहे. राऊतवाडी परिसरातील दोन सराफा दुकानांचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री चोरी केली आहे. सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अकोला शहरातील राऊतवाडी परिसरातील खरोटे ज्वेलर्स आणि धनराज ज्वेलर्स या सराफा दुकानांचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री चोरी केली आहे. सकाळी दुकानदार दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. या चोरीत नेमका किती रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे, याचा आकडा अद्याप समोर आलेला नसून दुकानातील मालाची पडताळणी सुरू आहे. या घटनेमुळे सराफा व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून चोरट्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे