कलियुगातील सावित्रीने यकृत दान करून पतीला दिले नवजीवन
अकोला, 07 ऑगस्ट (हिं.स.)। ज्या प्रमाणे सत्यवानसाठी सावित्री धावून आली होती, आणि यमाच्या हातून प्राण खेचून आणले होते. अगदी तसाच प्रसंग अकोल्यात पाहायला मिळाला आहे. आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आणि त्यात पतीच्या यकृत (लिव्हर) प्रत्यारोपणाच संकट,
Photo


अकोला, 07 ऑगस्ट (हिं.स.)।

ज्या प्रमाणे सत्यवानसाठी सावित्री धावून आली होती, आणि यमाच्या हातून प्राण खेचून आणले होते. अगदी तसाच प्रसंग अकोल्यात पाहायला मिळाला आहे. आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आणि त्यात पतीच्या यकृत (लिव्हर) प्रत्यारोपणाच संकट, अश्या दुहेरी विवंचनेत असलेल्या अकोल्यातील वर्षा इंगळे यांनी स्वतःचा यकृताचा काही भाग पतीला दान करून जीवनदान दिल आहे. आणि त्यांना मदत केली ती मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्टने, यांच्या दोघांच्या संयुक्त आर्थिक पाठबळामुळे अकोला येथील प्रशांत इंगळे यांच्यावर मुंबईतील प्रसिद्ध नानावटी रुग्णालयात यशस्वी यकृत प्रत्यारोपण करण्यात आले.

प्रशांत इंगळे हे अकोला येथे केबल टाकण्याचे काम करून आपल्या कुटुंबाचा गाडा चालवतात. त्यांच्या कुटुंबात वृद्ध आई-वडील, पत्नी, महाविद्यालयीन शिक्षण घेणारी मुलगी आणि दहावीत शिकणारा मुलगा असा परिवार आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर २०२५ दरम्यान प्रशांत यांना अचानक पोटदुखीचा त्रास सुरू झाला. अकोला आणि नागपूर येथे विविध वैद्यकीय तपासण्या केल्यावर त्यांचे यकृत गंभीररीत्या निकामी झाल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी त्यांना तातडीने यकृत प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. मात्र, या उपचारासाठी तब्बल २५ ते ३० लाख रुपयांची आवश्यकता होती, जी या कुटुंबाच्या आर्थिक क्षमतेबाहेर होती.

लाखो रुपयांच्या या खर्चापुढे इंगळे कुटुंब हतबल झाले होते. त्यात यकृत प्रत्यारोपणच संकट अश्या दुहेरी संकटात प्रशांत इंगळे यांच्या पत्नी वर्षा इंगळे यांच्या समोर होत्या, अश्यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष धावून आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून तातडीने २ लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली. एवढ्यावरच न थांबता, मदत कक्षाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे 'टाटा ट्रस्ट'कडून तब्बल १९ लाख ६० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळवण्यात यश आले. अशाप्रकारे एकूण २१ लाख ६० हजार रुपयांचा निधी गोळा झाल्यामुळे हे अत्यंत खर्चिक ऑपरेशन यशस्वीपणे पार पडू शकले. शासकीय योजना आणि सामाजिक संस्थांच्या संवेदनशीलतेमुळे आज एका कष्टकरी कुटुंबाचा आधार संकटातून सुखरूप बाहेर पडला आहे. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेन्द्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

पतीचे यकृत निकामी झाल्याने हतबल झालेल्या वर्षा इंगळे यांनी मोठ्या हिंमतीने स्वतःला सावरत मदत मिळवली, पण यकृत प्रत्यारोपणाची नवी अडचण त्यांच्या समोर होती, मग स्वतः वर्षा इंगळे यांनी पतीचं जीवन सुखकर करण्यासाठी आपलं यकृत दान केलं. आणि यमाच्या हातून एका सावित्री प्रमाणे पतीचे प्राण खेचून आणले.

आपल्या शरीरातील एक अंग दान करून सत्यावानाच्या सावित्री प्रमाणेच पत्नी यमदूताच्या आडवी आली. आणि पतीचे प्राण वाचवले, अशीच भावना प्रशांत इंगळे यांनी बोलून दाखवली आहे. पत्नीचं आयुष्यभर खूप सहकार्य लाभलं आणि आज तिने स्वतःच यकृत दान करून प्राण वाचवल्याने प्रवीण इंगळे भावुक झाले.

आपल्या पोटच्या गोळ्याला आपल्या पोटातील एक भाग दान करून मुलाला वाचवणाऱ्या सुनेबद्दल वर्षा इंगळे यांच्या बद्दल सांगताना सासू भावुक झाल्या, प्रवीण हा त्यांचा एकुलता एक मुलगा आहे. आणि त्याच्या उपचारासाठी दिवस रात्र सून वणवण भटकत होती, आणि स्वतःच यकृत दान करून त्याचं जीवन वाचवल्याने ही सून नसून जणू मुलगीच आमच्या पदरात पडल्याची भावना प्रवीण इंगळे यांच्या आईने बोलून दाखवली आहे.

मुख्यमंत्री सहायता निधी आणि टाटा ट्रस्ट कडून मोलाची मदत मिळालीच मात्र स्वतःच यकृत दान करून वर्षा इंगळे यांनी यमाच्या दारातून पतीचे प्राण खेचून आणले.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande