गतिमान प्रशासनातून विकसित महाराष्ट्राचे स्वप्न साकार होणार : विकास खारगे
अकोला, 07 ऑगस्ट (हिं.स.)। नागरिकांचे जीवनमान अधिक सुलभ, आणि गुणवत्तापूर्ण करण्यासाठी प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याने लोकाभिमुख दृष्टीकोनातून कार्य करावे. प्रशासनात आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता डिजिटल कार्यपद्धती आणि गतिमान प्रशासनाचा प्रभावी
Photo


अकोला, 07 ऑगस्ट (हिं.स.)। नागरिकांचे जीवनमान अधिक सुलभ, आणि गुणवत्तापूर्ण करण्यासाठी प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याने लोकाभिमुख दृष्टीकोनातून कार्य करावे. प्रशासनात आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता डिजिटल कार्यपद्धती आणि गतिमान प्रशासनाचा प्रभावी वापर करून शासकीय सेवा अधिक जलद व परिणामकारक करण्यावर भर द्यावा, असे निर्देश राज्याचे महसूल अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

विभागीय आयुक्त नयना गुंडे, जिल्हाधिकारी वर्षा मीना, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे,उपजिल्हाधिकारी जोगेंद्र कट्यारे, विजय पाटील, महेश परांडेकर, निखिल खेमनार,भूमी अभिलेख अधीक्षक भारती खंडेलवाल, जिल्हा अग्रणी प्रबंधक नयन सिन्हा,उपविभागीय अधिकारी, तहसीलदार विभाग प्रमुख आदी उपस्थित होते

खारगे म्हणाले की राज्य शासनाचे विकसित महाराष्ट्र व्हिजन डॉक्युमेंट महाराष्ट्राला २०४७ पर्यंत देशातील सर्वाधिक प्रगत, सक्षम आणि समृद्ध राज्य म्हणून घडविण्याच्या उद्देशाने महत्त्वाची भूमिका बजावणारे आहे.त्याची प्रभावी अंमलबजावणी करीत नागरिकांचे जीवनमान सुकर करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.

प्रशासनातील निर्णयप्रक्रिया अधिक जलद आणि पारदर्शक करण्यासाठी ई-ऑफिस प्रणालीचा व्यापक वापर,ऑनलाइन सेवा वितरण,कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, डेटा-आधारित निर्णयप्रक्रिया आणि नागरिकाभिमुख प्रशासन या बाबींवर विशेष भर देण्याचे निर्देश श्री.खारगे यांनी दिले.

श्री.खारगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील वॉर रूम,इ कोतवाल प्रणाली व आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उपक्रमांचे कौतुक केले.

विविध ठिकाणी भेट पाहणी व आढावा

महसूल अपर सचिव श्री.खारगे यांनी अकोला तहसील व उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे पाहणी करून विविध बाबींचा आढावा घेतला,शहरातील तहसील कार्यालय परिसरात कार्यरत आधार सेवा केंद्र, आपले सरकार सेतू केंद्रांना भेट देत आढावा घेत नागरिकांशी संवाद साधला. तलाठी कार्यालय येथे भेट दिली.

जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या वतीने साकारण्यात आलेल्या ऑलिंपिक दर्जाच्या जलतरण तलावाची पाहणी केली. सांस्कृतिक भवन येथील नाट्यगृहामध्ये उत्तम संगीत व लाईट व्यवस्था करण्याचे निर्देश दिले.

कापशी तलाव परिसर व पांदण रस्त्याची पाहणी करीत स्वयंभू गणेश मंदिरात दर्शन घेतले.यावेळी श्री.खारगे व मान्यवरांच्या उपस्थितीत कापसी तलाव परिसरातील ऑक्सीजन पार्क येथे वृक्षारोपण करण्यात आले.गावे एकत्रित असली की विकासाच्या दृष्टीने वाटचाल होते असे प्रतिपादन यावेळी श्री.खारगे यांनी केले. यावेळी कापशीरोड, कापशी तलाव गावातील सरपंच व नागरिक उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसराची पाहणी

श्री.खारगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सह.निबंधक कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालयातील विविध ऑनलाइन सुविधांचा आढावा घेत नागरिकांशी संवाद साधला.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande