
नांदेड, 07 ऑगस्ट (हिं.स.)।
इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह योजना राबविण्यात येत आहे. सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी या योजनेअंतर्गत प्रवेशासाठी 7 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2026 या कालावधीत ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.
या योजनेत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी भोजन व निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. तसेच शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी निश्चित आर्थिक सहाय्य विद्यार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यात थेट जमा करण्यात येते.
याशिवाय, शासकीय वसतिगृहासाठी पात्र असूनही गुणवत्तेनुसार किंवा वसतिगृहाच्या मर्यादित क्षमतेमुळे प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या अर्जांचा पंडित दीनदयाळ स्वयंम् योजना आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना अंतर्गत विचार करण्यात येणार आहे.
बारावीनंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक पदवी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थी-विद्यार्थिनींनी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर 7 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2026 या कालावधीत ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक सचिन खुणे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis