माजी सैनिकांच्या पाल्यांना शैक्षणिक आर्थिक मदत; प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर, 07 ऑगस्ट (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील माजी सैनिक, त्यांच्या पत्नी, विधवा तसेच पाल्यांसाठी विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांकरिता एकरकमी आर्थिक मदत देण्यात येणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह आपले प्रस्ताव दि.
माजी सैनिकांच्या पाल्यांना शैक्षणिक आर्थिक मदत; प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन


छत्रपती संभाजीनगर, 07 ऑगस्ट (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील माजी सैनिक, त्यांच्या पत्नी, विधवा तसेच पाल्यांसाठी विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांकरिता एकरकमी आर्थिक मदत देण्यात येणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह आपले प्रस्ताव दि. ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत इयत्ता दहावीच्या परीक्षेत किमान ६० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या पाल्यांना आर्थिक मदत दिली जाते. तसेच इयत्ता दहावी अथवा बारावीच्या परीक्षेत किमान ६० टक्के गुण मिळवून अभियांत्रिकी व तत्सम पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या पाल्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

इयत्ता बारावीच्या परीक्षेत किमान ६० टक्के गुण मिळवून वैद्यकीय, अभियांत्रिकी, आयुर्वेदिक तसेच अन्य पदवी अभ्यासक्रमांसाठी पुढील शिक्षण घेणारे पाल्यही आर्थिक मदतीसाठी पात्र आहेत. त्याचप्रमाणे कला, विज्ञान, अध्यापक विद्यालय, अध्यापक महाविद्यालय, विधी, पदविका व अन्य तांत्रिक शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या पाल्यांसाठीही योजनेत आर्थिक मदतीची तरतूद आहे.पदवी परीक्षेत किमान ६० टक्के गुण मिळवून पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या पाल्यांना तसेच इयत्ता बारावीच्या परीक्षेत ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून परराज्यात व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या माजी सैनिक अथवा विधवांच्या पाल्यांनाही नियमानुसार एकरकमी आर्थिक मदतीचा लाभ मिळणार आहे.

पात्र माजी सैनिक, विधवा व त्यांच्या पाल्यांनी योजनेसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे जोडून परिपूर्ण प्रस्ताव निर्धारित मुदतीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सादर करावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande