
अमरावती, ७ ऑगस्ट (हिं.स.) : तालुक्यातील बदनापूर केंद्रांतर्गत बागलिंगा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील एका शिक्षकाच्या सततच्या कथित अनुपस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या प्रकारामुळे सहा विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळा सोडून मुलांचा प्रवेश इतर शाळांमध्ये घेतल्याचे समोर आले आहे.
बागलिंगा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत एकूण ८७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संबंधित शिक्षकांकडे इयत्ता तिसरी, चौथी आणि पाचवीच्या अध्यापनाची जबाबदारी आहे. मात्र ते महिनाभरापासून नियमितपणे शाळेत उपस्थित राहत नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे. तसेच शाळेत आल्यावरही विद्यार्थ्यांना प्रभावी अध्यापन होत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे.
पालकांच्या मते, शिक्षकांच्या कथित अनुपस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, यामुळे सहा विद्यार्थ्यांनी शाळेचे दाखले (टीसी) घेऊन इतर शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे. या प्रकरणाबाबत मुख्याध्यापक आणि पालकांनी वरिष्ठ शिक्षण अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्या असल्या तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
दरम्यान, संबंधित शिक्षकांच्या रजा वरिष्ठ कार्यालयातून 'मॅनेज' केल्या जात असल्याचाही आरोप पालकांनी केला असून, संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ व पालकांनी केली आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप
शिक्षक महिनाभरापासून नियमित गैरहजर आहेत. शाळेत आले तरी विद्यार्थ्यांना काहीच शिकवत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, सहा विद्यार्थ्यांनी टीसी काढून दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतला आहे, असा दावा बागलिंगा येथील पालक श्यामराव धोत्रे, रोशन मानकर आणि युवराज हिरालाल बेलसरे यांनी केला.
याबाबत गटशिक्षणाधिकारी बी. आर. गिरासे यांनी सांगितले की, बागलिंगा येथील केंद्रप्रमुख व विस्तार अधिकाऱ्यांना चौकशीसाठी पाठविण्यात येणार असून, त्यांच्याकडून अहवाल मागविण्यात येईल. त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी