
लातूर, 07 ऑगस्ट (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने आपल्या कामकाजात पारदर्शकता, गती आणि सुरक्षितता आणण्याच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. परिवहन विभागातील क्षेत्रीय (फील्ड) अधिकाऱ्यांसाठी आता 'बॉडी वेअरेबल कॅमेरा' (Body Wearable Cameras) वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे रस्ते वाहतूक अंमलबजावणीसह परिवहन कार्यालयातील विविध चाचण्या अधिक सुरक्षित व शिस्तबद्ध होणार आहेत.
विशेषतः 'वायुवेग पथका' मार्फत रस्त्यावर केली जाणारी थेट वाहनांची तपासणी आणि दंडात्मक कारवाईदरम्यान या कॅमेऱ्यांचा प्रामुख्याने वापर केला जाईल.
बॉडी वेअरेबल कॅमेऱ्यांचे मुख्य फायदे:
वस्तुस्थितीचे थेट जतन: कारवाईदरम्यान घडणाऱ्या संपूर्ण प्रसंगाचे डिजिटल रेकॉर्डिंग होणार असल्याने कामातील अचूकता वाढेल.
नागरिक व अधिकाऱ्यांची सुरक्षितता:
रस्त्यावरील कारवाई दरम्यान वाहनचालक आणि अधिकारी यांच्यातील संवाद सभ्य आणि पारदर्शक राहील, ज्यामुळे वादाचे प्रसंग टळून दोन्ही बाजूंच्या सुरक्षेची ग्वाही मिळेल.
कामात पारदर्शकता: ड्रायव्हिंग लायसन्स चाचणी तसेच वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्राच्या (Fitness Certificate) नूतनीकरण प्रक्रियेचे डिजिटल रेकॉर्डिंग उपलब्ध राहील.
कायदेशीर भक्कम पुरावा:
प्रत्येक कारवाईचे डिजिटल पुरावे उपलब्ध राहणार असल्याने कायदेशीर प्रक्रियेत सुलभता येईल आणि प्रशासकीय कामकाजाला गती मिळेल.
प्रादेशिक परिवहन कार्यालय, लातूर तर्फे आवाहन:
परिवहन विभागाचा हा निर्णय वाहनचालक, वाहनधारक आणि अधिकारी या सर्वांच्याच हिताचा आहे. नागरिकांनी तपासणीदरम्यान वाहनांची सर्व वैध कागदपत्रे सोबत ठेवावीत आणि वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करून रस्ता सुरक्षेत सहकार्य करावे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis